पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर शहरात कडक निर्बंध लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील सर्व प्रकारच्या खासगी कार्यालये (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह आदेशानुसार सुरु ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. या आदेशामधून उत्पादन क्षेत्राला मात्र वगळण्यात आले आहे. वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास आस्थापना बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे.
उत्पादन क्षेत्र संपूर्ण क्षमतेने सुरु ठेवता येणार असले तरी कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळले जाईल यानुसार कर्मचारी यांचे उपस्थितीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित आस्थापनांनी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सकाळ, दुपार, रात्र पाळी) कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासोबतच पूर्वीच्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची नाट्यगृह आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार आहेत. अनिश्चित कालावधीसाठी कोणतेही राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम / सभा संमेलन घेता येणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांकडून/ कर्मचाऱ्यांकडून मास्कचा वापर व सामाजिक अंतर पाळला जाण्याबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा कसे यावर लक्ष ठेवण्याकरिता संबंधित आस्थापनांनी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत. या नियमांचा भंग झाल्यास केंद्र शासन आपत्ती संपूर्णपणे संपली असे जाहीर करत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील. तसेच आस्थापनांच्या मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
---------
पालिका क्षेत्रातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थिती बाबत निर्णय घ्यावा. या कार्यालयांमध्येही मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.