लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोना लसीकरण जलदगतीने होण्यासाठी आयटी इंडस्ट्री, व्यापारी, मोठे उद्योग, कंपन्या, खासगी संस्था यांना स्वखर्चाने कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत बागुल म्हणाले की, पुणे शहर व परिसरात तसेच पुणे जिल्ह्यातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्याचा प्रसार अद्यापही रोखला गेलेला नाही. अशावेळी पुणे शहरातील आयटी इंडस्ट्री, व्यापारी, मोठे उद्योग, कंपन्या, खासगी संस्था स्वत: लस खरेदी करून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यास तयार आहेत. त्यासाठी लागणारे डॉक्टर व इतर सर्व स्टाफची व्यवस्थादेखील ते करणार आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या लस कर्मचाऱ्यांना देऊन शासकीय नियमांप्रमाणे नोंदणी करण्यास तयार आहेत.
महापालिकेचा ताण कमी होण्यास मदत
संबंधित आस्थापना यांना यासाठी आवश्यक सर्व परवानग्या दिल्यास लाखो कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल व महापालिकेवरील लसीकरणाचा ताण कमी होईल. त्यामुळे पुणे शहराची लोकसंख्या पाहता लसीकरण लवकर होण्यासाठी कंपन्या, खासगी संस्थांना स्वखर्चाने त्यांच्या कामाच्या ठिकाणी लसीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी बागुल यांनी केली आहे.