पुणे : जमिनीची मोजणी झाली असताना जागेची हद्द कायम करुन देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना भूमापक लिपिकासह एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
नगर भूमापक लिपिक वर्ग ३ प्रमोद गणेश तुपे (वय ३२) आणि खासगी व्यक्ती नवनाथ पांडुरंग मेमाणे (वय ३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या जमिनीची माेजणी झाली आहे. या जागेची हद्द कायम करुन देण्यासाठी तक्रारदाराने पुरंदर तालक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी नगर भूमापक लिपिक प्रमोद तुपे याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यात तडजोडी अंती त्यांनी ३ हजार रुपये घेण्यास मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सासवड येथील कार्यालयात सापळा रचला. खासगी व्यक्तीमार्फत लाच घेताना पकडण्यात आले. सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करीत आहेत.