पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहरात दुचाकी व चारचाकी या वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक भागातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी लागली. पण ही वाहतूक सुरू असताना नियमांकडे मात्र डोळेझाक होत आहे. दुचाकीवर एक आणि चारचाकीमध्ये केवळ दोघांनाच परवानगी असूनही त्याचे पालन होताना दिसत नाही. तर दुसरीकडे रिक्षा आणि पीएमपी बससेवेबाबत मात्र प्रशासनाची ताठर भूमिका अजूनही कायम आहे. त्यामुळे या सेवाही काही निर्बंधासह सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना संचारबंदी करण्यात आली. मागील महिन्यात दुचाकी व चारचाकी वाहनांना काही अटींवर परवानगी देण्यात आली. देशांतर्गत विमानसेवाही सुरू झाली. १ जूनपासून २०० रेल्वेगाड्याही धावू लागल्या. पण रिक्षा व पीएमपीच्या बससेवा बंदच ठेवण्यात आली. दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला तर चारचाकीमध्ये दोघांना परवानगी आहे. पण प्रत्यक्षात सध्या या नियमांकडे बहुतेक जण दुर्लक्ष करत आहेत. दुचाकीवरून दोघे जण तर चारचाकीमध्ये दोनहून अधिक व्यक्ती प्रवास करताना दिसत आहेत. पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील आठवडाभरात तर खासगी वाहनांची रस्त्यांवरील संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली.याविषयी नाराजी व्यक्त करताना रिक्षा पंचायतचे निमंत्रक नितीन पवार म्हणाले, लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांसह तुळशीबागही सुरू करण्यावर निर्णय घेतला जातो. पण जनजीवन पूर्वपदावर आणायचे असेल तर रिक्षा व बसला परवानगी द्यायलाच हवी. दुचाकीवरून जाण्यास महिलांसह ज्येष्ठांना मयार्दा आहेत. त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. रिक्षा सुरू झाल्याशिवाय जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. त्यामुळे रिक्षाला दोन प्रवासी नेण्याची परवानगी द्यायला. रिक्षाचालक पूर्ण दक्षता घेऊन प्रवाशांना सेवा देतील. रिक्षा सुरू झाल्यानंतर त्यांना याबाबत प्रशिक्षणही दिले जाईल.---------------पिंपरी-चिंचवडमध्ये ५० टक्के बस मार्गावर धावत आहेत. त्याप्रमाणे पुण्यातही नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही सज्ज आहेत. प्रामुख्याने वर्दळीचे मार्ग, एमआयडीसी, आयटी कंपन्या, बाजारपेठा, महत्त्वाच्या ठिकाणी बस सोडण्याला प्राधान्य असेल. बसमध्ये मार्किंगचे कामही सुरू आहे.- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी---------------दुचाकी व चारचाकी तसेच कॅब वाढल्याने आधीच रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला आहे. विमा, पासिंग, परवाना इतर शुल्क भरमसाठ वाढले आहे. आता लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहे. रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आल्याने रिक्षाला मान्यता द्यायला हवी.- किशोर राखुंडे, रिक्षाचालक
पुणे शहरात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर 'खासगी वाहने जोमात, रिक्षा-पीएमपी कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 8:39 PM
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहरात दुचाकी व चारचाकी या वाहनांची गर्दी वाढू लागली आहे...
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना संचारबंदी