पुणे : पुणे स्मार्ट सिटी होणार असल्याचे सर्वत्र गाजावाजा सुरू आहे. परंतु, खरं तर शहराला स्मार्ट करण्यापेक्षा ‘शाश्वत स्मार्ट पुणे’ करणे आवश्यक आहे. राहण्यायोग्य शहर हवे. त्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत, अशी खंत ‘समुचित एनव्हायरो टेक’च्या संचालक प्रियदर्शनी कर्वे यांनी व्यक्त केली.समुचित एन्व्हारो टेक, आयएनइसीसी, लाया या संस्थांतर्फे ‘शाश्वत स्मार्ट पुणे २०३०’ या प्रकल्प अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी इकॉलॉजिकल सोसायटीचे गुरुदास नूलकर उपस्थित होते.कर्वे म्हणाल्या, ‘‘शहरातील काही भागच स्मार्ट होणार आहेत. खरं तर स्मार्ट होण्याऐवजी राहण्यायोग्य शहर करणे गरजेचे आहे. ते उद्दिष्ट समोर ठेवून पुणे महापालिकेने काम करणे आवश्यक आहे. वर्षभर २४ तास पाणीपुरवठा करणार आहेत. परंतु, त्यासाठी भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन किती गरज लागणार आहे, गळती थांबविण्यावर काही ठोस उपाय आहेत का, सांडपाणी पुनर्वापर करण्यावर भर देणार का, पाण्याचे सर्वांना न्याय पद्धतीने वाटप करणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे महापालिकेकडे नाहीत. यावर काम करणे महत्त्वाचे आहे.’’सध्या शहरातील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यावर महापालिका काहीच करीत नाही. झोपडपट्टीधारकांना घरे देण्यावर काहीच उपाय नाहीत.तसेच नवीन झोपडपट्टी होऊ नये, म्हणून काहीच उपाययोजनाझालेल्या नाहीत.शहरात सायकल चालविणाऱ्यांसाठी ट्रॅकचे चांगले जाळे उभे केले पाहिजे. त्याबाबत विचार होत नाही. सार्वजनिक वाहतूक, पीएमपी, आॅटो रिक्षा या सर्व वाहतूक साधनांचा समन्वय साधून वाहतूककोंडीवर उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही कर्वे यांनी सांगितले.राहण्यायोग्य पुण्यासाठी तीन ‘टुल’पुणेकरांना राहण्यायोग्य शहर करायचे असेल, तर तीन टुल आवश्यक आहेत. त्यामध्ये एक पायाभूत सुविधा चांगल्या करणे, आर्थिक स्थितीवर लक्ष, टेक्नॉलॉजीचा वापर चांगला करणे.दुसरे समाज सोशल फे्रंडली झाला पाहिजे. एकमेकांना चांगली मूल्ये दिली, घेतली पाहिजेत. त्यामुळे चांगले काम करण्यासाठीचे सामाजिक वातावरण निर्माण होईल.तिसरे टुल म्हणजे महापालिकेने सर्व सुविधांची देखभाल, दुरुस्ती चांगली ठेवली पाहिजे. त्यावर सातत्याने भर दिला पाहिजे. या तीन टुलवर काम केले तर पुणे राहण्यायोग्य बनू शकेल, असे गुरुदास नूलकर यांनी सांगितले.पर्यावरणाकडे प्रचंड दुर्लक्षनूलकर म्हणाले, ‘‘आपले पर्यावरणाकडे लक्षच नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्याचा परिणाम भावी पिढीला भोगावा लागणार आहे. आपल्याकडे वेस्टेजची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नाही. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. उरळी देवाची येथील वातावरण प्रदूषित झाले आहे. जोपर्यंत नागरिक जागरूक होऊन याबाबत बोलत नाहीत आणि कृती करीत नाहीत, तोपर्यंत पुणे राहण्यायोग्य होऊ शकत नाही.’’
स्मार्ट नव्हे, राहण्यायोग्य शहर हवे - प्रियदर्शनी कर्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 2:08 AM