पुणे: काँग्रेसच्या अखिल भारतीय सरचिटणीस प्रियंका गांधी गुरूवारी दिवसभर पुण्यात होत्या. कोरेगाव पार्क येथील एका नातेवाईकाकडे त्या आल्या होत्या. त्यांचा हा दौरा गुप्त ठेवण्यात आला होता, तरीही काँग्रेसचे काही स्थानिक पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते, मात्र त्यांनी हा सत्कार स्विकारला नाही.
सकाळी बरोबर साडेअकरा वाजता प्रियंका विमानतळावर आल्या. तिथून त्या लगेच गाडीतून कोरेगाव पार्ककडे त्यांच्या नातेवाईकाच्या घरी रवाना झाल्या. बुधवारी त्या राजस्थानात होत्या. तिथून सायंकाळी दिल्लीस गेल्या व आज सकाळी दिल्लीहून पुण्यात आल्या. त्यांचा हा दौरा खासगी असल्याने पक्षाच्या कोणाही पदाधिकाऱ्याला त्याबाबत कळवण्यात आले नव्हते. तरीही काही स्थानिक पदाधिकारी विमानतळावर उपस्थित होते. मात्र प्रियंका यांनी त्यांचे स्वागत स्विकारले नाही. सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या गराड्यातच त्या गाडीत बसून लगेचच त्या तिथून निघाल्या.
कोरेगाव पार्क येथे त्या जाणार असल्याचेही गुप्त ठेवण्यात आले होते. संबधित नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांना बाजूलाच ठेवले असल्याचे समजते. त्यांनी दुपारी सुरक्षा रक्षकांना सोडून संबधित कुटुंबातील काहीजणांबरोबर कोरेगाव पार्क मध्ये फेरफटका मारला असल्याची माहिती मिळाली. रात्री त्या दिल्लीस रवाना होणार असल्याची माहिती मिळाली.