पुणे : लडकी हुं, लड सकती हुं या प्रियंका गांधी यांनी दिलेल्या घोषणेमुळे देशभरातील महिलांना उर्जा मिळाली आहे. अत्याचारांचा सामना आम्ही खंबीरपणे करू हा इशारा पिंक मोर्चाद्वारे राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. यापुढे कोणत्याही अत्याचाराविरोधात महिला रस्त्यावर येऊन न्याय मागतील असंही त्या म्हणाल्या आहेत.
प्रियंका गांधी यांनी दिलेल्या या घोषणेला १२५ दिवस झाले म्हणून महिला काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने सोमवारी दुपारी गूडलक चौकात सभा घेण्यात आली. सर्व महिला सभेला गुलाबी गणवेश परिधान करून आल्या होत्या.
ठाकूर यांनी यावेळी भाजपाच्या राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असल्याची टीका केली. त्यांना महिलांना पुन्हा एकदा मागच्या शतकात घेऊन जायचे आहे. देशातील महिला शक्ती यापुढे त्यांना बरोबर त्याची जागा दाखवेल. त्याची सुरूवात उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या निकालापासून होईल असे ठाकूर म्हणाल्या.
भाजपने जनतेचा भ्रमनिरास केला
''शिवजयंतीला शिवछत्रपतींच्या चरणी आम्ही महिला धोरणाचा मसुदा ठेवला. आता येत्या ८ मार्चला महिला दिनी तो जाहीर करू. त्यात अनेक तरतुदी केल्या आहेत. महिलांना संरक्षण देणे हा मुळ उद्देश आहे. राज्यात काँग्रेसला वगळून कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. राज्यघटनेबाबत भारतीय जनता पार्टीला अजिबात आस्था नाही. त्यांच्याकडून आता जनतेचा भ्रमनिरास होत आहे असे यशोमती ठाकूर (महिला, बाल कल्याण मंत्री) त्यांनी सांगितले.''
मंत्री ठाकूर यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी, प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी, नीता रजपूत, नगरसेविका लता राजगुरू, वैशाली मराठे सहभागी झाले होते.