आळंदी : आळंदीतील प्रियांका अभिषेक उमरगेकर या नवविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू - सासऱ्यांवर आळंदी पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांका अभिषेक उमरगेकर (वय २९) यांनी रविवारी (दि.१०) राहत्या घरी गळफस लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी अनिल उर्फ बापू अभिमान घोलप (वय ४५ रा. निगडी प्राधिकरण, पुणे) यांनी उमरगेकर कुटुंबियांच्या विराेधात आळंदी पोलिसांत तक्रार नाेंदवली आहे.
या तक्रारीत लग्नातील हुंडा म्हणून देण्याचे राहिलेले फर्निचर व इतर संसार उपयोगी वस्तूंकरिता तसेच घरातील इतर किरकोळ कारणांवरून तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे, छळ करणे, अपमानास्पद वागणुक देणे आदी त्रासामुळे प्रियाकांने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीनूसार पाेलीसांनी (कलम ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ), ३४) आळंदी नगरपरिषदेतील भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता अशोक उमरगेकर - कांबळे, माजी नगरसेवक अशोक भगवान उमरगेकर - कांबळे व प्रियांकाचे पती अभिषेक अशोक उमरगेकर - कांबळे (सर्व रा. संतोषी माता मंदिराच्या मागे, आळंदी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू आहे. प्रियांका या पिंपरी - चिंचवडच्या माजी नगरसेविका कमल अनिल घोलप यांची मुलगी हाेत. त्यांचा विवाह आठ महिन्यांपूर्वी आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वैजयंता अशोक उमरगेकर यांचा मुलगा अभिषेक याच्याशी झाला हाेता.