पुणे : कलाकारांसाठी राष्ट्रीय पुरस्काराचे वेगळे महत्व असते. मलाही राष्ट्रपतींच्याच हस्ते तीन पुरस्कार मिळाले. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळावा, अशी अपेक्षा ठेवणे सार्थ आहे. पुरस्कार त्यांच्याच हस्ते मिळाला नाही तर कलाकारांची नाराजीही स्वाभाविक आहे. मात्र, राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडली. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण गुरुवारी नवी दिल्ली येथे पार पडले. राष्ट्रपतींच्या हस्ते केवळ ११ पुरस्कार देण्यात आले. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे स्मृती इराणी यांच्या हस्ते उर्वरित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याबाबत कलाकारांनी आक्षेप नोंदवला. याबाबत पुण्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केले.बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत विचारले असता पाटेकर म्हणाले, ‘जास्त एफएसआय मिळत असेल आणि अधिक नाट्यगृहे उभारता येत असतील तर बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास करायला हरकत नाही. जुनी वास्तू आहे,आमच्या काळात असं होतं म्हणण्यात अर्थ नाही. नाट्यवेडया प्रेक्षकाची कलाकृतींकडील ओढ कमी होत नाही. त्यामुळं नवीन नाट्यगृह बांधायला उशीर झाला तरी प्रेक्षक दूर जातील, असे वाटत नाही.’ आयपीएल दोन वर्षात बंद पडेल, असे वाटलं होते. मात्र, दहा वर्षे उलटूनही प्रतिसाद कायम आहे, असे सांगत नानापाटेकर यांनी बालगंधर्व नाट्यगृहाचा पुर्नविकास करुन नवीन वास्तू बांधण्याच्या बाजूने भूमिका घेतली.