खोर : देऊळगावगाडा (ता. दौंड) परिसरामधील असलेली बारवकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागेच्या वादाच्या भोवऱ्यात सापडली गेली आहे. देऊळगावगाडा केंद्रातील प्रथम क्रमांकाची आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त म्हणून नावारूपास आलेली शाळा आता जागेच्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.ग्रामपंचायत माजी सदस्य मारुती कोकरे यांनी सन १७ आॅगस्ट २०१२ मध्ये आपली आई हौसाबाई कोकरे यांच्या गट नं. ३०९ मधील हिश्श्याची ०.०५ आर क्षेत्र जागा ही राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे सरपंच ग्रामपंचायत देऊळगावगाडा यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी बक्षिसपत्र केले होते.त्यानंतर जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१२-१३ मध्ये दोन शाळा वर्गखोल्यांना बांधकामासाठी मंजुरीदेखील मिळाली. त्यानुसार त्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणे व उपाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत वर्गखोल्यांचे भूमिपूजनही करण्यात आले. परंतु आजतागायत या जागेत तीन वर्षे ओलांडूनदेखील शाळेची इमारत उभी राहिली नाही. कारण बक्षिसपत्र एका जागेचे व बांधकाम दुसऱ्या जागेत केले असल्याचा प्रकार घडला. हा सर्व प्रकार एका राजकीय पुढाऱ्याच्या हातून होत असल्याचे देऊळगावगाडा ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. या दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता परिसरामधून जोर धरू लागली आहे. या जागेमध्ये लवकरात लवकर वर्गखोल्यांचे काम व्हावे, अन्यथा जागा परत करण्याची मागणी मारुती कोकरे यांनी केली आहे. परंतु दुसऱ्या जागेत बांधकाम केलेली जागा ही पंचायत समितीच्या उपसभापती आशा डेंबळकर यांच्या सासूची वडिलोपार्जित असून ही जागा ग्रामस्थांच्या बैठकीत संमतीपत्राद्वारे व पंचायत समितीच्या परवानगीनुसार देण्यात आली असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास डेंबळकर यांनी सांगितले आहे.
बक्षीसपत्र एका जागेचे, बांधकाम मात्र दुसऱ्या ठिकाणी
By admin | Published: May 09, 2016 12:47 AM