इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला, केंद्रातही अन् राज्यातही; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना प्रतिटोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 04:54 PM2021-07-09T16:54:30+5:302021-07-09T17:06:05+5:30
मोदी सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.
पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना मोदी सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका केली होती. पटोलेंच्या या टीकेला आता भाजपकडून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिटोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ते डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्द्दल बोलत आहे का? असा प्रतिसवाल उपस्थित करतानाच ते म्हणाले इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला आहे. जो केंद्रातही आणि राज्यातही आहे.
फडणवीस म्हणाले, ओबीसींच्या प्रश्नाच्या मुद्द्यांवरून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र, यावरूनच सत्ताधारी पक्षाची मानसिकता उघड झाली आहे. १२ आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीला फासावर लटकवण्याचेकाम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत टाईमपास करायचा आहे.चुकीच्या पद्धतीने आमचे बारा आमदार निलंबित केले. त्याविरोधात आम्ही जनतेत जाऊ आणि गरज पडली तर न्यायालयात देखील दाद मागण्यासाठी जाणार आहोत.
मी २२ वर्षांपासून सभागृहात आहे. आणि त्याचे पूर्ण भान ठेवून आणि विश्वासाने सांगतो की, भाजपच्या एकही नेत्याने सभागृहात हाणामारी किंवा शिवीगाळ केलेली नाही. हा यावेळी वाद झाले. मात्र कोणीही नेत्याने पीठासीन अधिकाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण केलेली नाही. हे सर्व सत्ताधारी पक्षाचे कपोलकल्पित कुभांड आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.