पुणे : कृषी महाविद्यालयाच्या जागेवर होणाऱ्या मेट्रो डेपोच्या कामापूर्वी तेथील वृक्षांच्या विनापरवाना स्थलांतराची समस्या लवकरच सुटेल, अशी ग्वाही महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून देण्यात आली. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठकही लवकरच होणार असून तत्पूर्वी महामेट्रो व महापालिका यांच्यात वरिष्ठ स्तरावर यासंदर्भात चर्चा होईल, असे या अधिकाºयांकडून सूचित करण्यात आले.कृषी महाविद्यालयाची काही जागा मेट्रोच्या डेपोसाठी म्हणून महामेट्रो कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्या जागेवर १ हजारापेक्षा जास्त झाडे आहेत. त्यातील बरीचशी पेची, आंब्यांची तर काही डाळिंब व अन्य फळांची आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी म्हणून ती लावण्यात आली होती. महामेट्रोने वर्षभरापूर्वी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे ही झाडे स्थलांतरित करण्यासाठी म्हणून परवानगी मागितली होती, मात्र त्यावर काहीच निर्णय होत नव्हता. समितीची स्थापना झाली नव्हती, स्थापन झाली तर त्यांची बैठकच होत नव्हती, यामुळे हा निर्णय प्रलंबित होता.मध्यंतरी समितीची बैठक झाली, त्यात काही सदस्यांनी जागा पाहणीची मागणी केली. त्यानुसार पाहणी करण्यात आली, मात्र त्यानंतरही निर्णय होत नव्हता.महामेट्रोचा प्रस्ताव नियमांमध्ये बसणारा नाही, स्थलांतर कुठे करणार याचा तपशील नाही, अनामत रक्कम भरलेली नाही असे काही मुद्दे समितीच्या सदस्यांकडून उपस्थित करण्यात आले. त्यावर काहीही निर्णय झाला नाही कारण समितीची बैठकच झाली नाही.दरम्यानच्या काळात मेट्रोला पावसाळ्यापूर्वी डेपोचे काम सुरू करायचे होते. त्यामुळे त्यांनी या वृक्षांचे स्थलांतर म्हणजे पुनर्रोपण करण्यास सुरुवात केली.कृषी महाविद्यालयाच्याच दुसºया जागेवर सुमारे १०० वृक्षांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले आहे. आणखी काही वृक्षांचे करण्यात येत आहे. ‘लोकमत’ने त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर समिती सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची गुरुवारी भेट घेतली व विनापरवाना हे काम सुरू आहे अशी तक्रार केली. महामेट्रोनेही याची दखल घेतली असून, महापालिका व महामेट्रो यांच्यात वरिष्ठ स्तरावर चर्चा होऊन हा विषय संपुष्टात येईल, असे सूतोवाच महामेट्रोच्या अधिकाºयांनी केले.
स्थलांतराची समस्या सुटेल, महामेट्रोची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 3:49 AM