भोर : शहरात अरुंद आणि जुने डांबरी रस्ते काढून नव्यानेच सिमेंटचे रस्ते बनविण्यात आले आहेत. शहरात सर्वच भागातील रस्ते आणि दोन्ही बाजूला टाकलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे रस्ते रुंद झाले आहेत. मात्र या नवीन रस्त्यांवर अनेक भागांत वाहने पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यांवरील पार्किंग बंद करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
शहरामध्ये पूर्वी डांबरी रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले होते. शिवाय सदरचे रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांनी सुमारे १० कोटी रु. निधी मंजूर करून मागील दोन वर्षांत भोर शहरातील ८५ ते ९० टक्के काँक्रिटचे रस्ते करून एका बाजूला गटारे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हिंग ब्लॉक टाकण्यात आले आहेत. यामुळे शहरातील बाजारपेठेतील भाग वगळता सर्वच रस्ते रुंद झाले असून, यामुळे वाहतूक सुरळीत होत आहे. मात्र शहरातील अनेक घरांना, बंगल्यांना व फ्लॅटधारकांना त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये पार्किंंगची सुविधा नाही. अनेक कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगच्या जागेवर गाळे, दुकाने काढल्याने राहणाऱ्या लोकांना पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे शहरात नवीन झालेल्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.भोर शहरातील बहुतांश इमारतीला ठेकेदाराने कागदोपत्री पार्किंग दाखवले आहे. मात्र प्रत्यक्षात पार्किंगच्या जागेवरच अनेक ठिकाणी गाळे, दुकाने व कार्यालये काढली आहेत, त्यामुळे इमारतीत राहणाºयांना गाड्या रस्त्यावरच लावाव्या लागतात. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.भोर शहरात नवीन झालेल्या काँक्रीट रस्त्यावर वाहने लावल्याने अडथळा निर्माण होत असेल तर नागरिकांनी वाहने रस्त्यावर लावू नयेत अन्यथा भोर नगरपालिकेकडून कारवाई केली जाईल.निर्मला आवारे,नगराध्यक्षा, भोर नगरपालिका