पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या निकालाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी शासन आदेशानुसार तत्काळ कमाल ७ सदस्यांची निकाल समिती स्थापन करावी. तसेच या समितीच्या माध्यमातून निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना सोमवारी राज्य मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचे सूत्र नुकतेच या राज्य शासनाने प्रसिद्ध केले. या सूत्रानुसार निकाल तयार करण्याचे काम प्रत्येक शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य व शिक्षकांना करावे लागणार आहे. राज्य मंडळातर्फे निकाल तयार करण्याच्या संदर्भातील प्रशिक्षण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाने प्रसिद्ध केले आहे.
कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, वर्ग शिक्षकांनी केलेल्या निकालाला अंतिम स्वरूप कसे द्यावे, या संदर्भातील प्रशिक्षण येत्या ७ ते २३ जुलै दरम्यान दिले जाणार आहे.
निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोणती कार्यवाही करावी, या संदर्भातील सविस्तर विश्लेषण राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात देण्यात आले आहे.
नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी खासगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आदी विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा. इयत्ता दहावीतील, अकरावीतील आणि बारावीच्या कोणत्या परीक्षांच्या गुणांचा समावेश निकाल तयार करण्यासाठी करावा, याबाबत राज्य मंडळाने सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे.