पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) कुलगुरू डॉ. नितीन करमळकर (nitin karmalkar) यांचा कार्यकाल येत्या मे महिन्यात संपुष्टात येणार असल्यामुळे विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाल संपुष्टात येण्यापूर्वीच राज्यपाल कार्यालयाकडून निवडीबाबतची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यानुसार राज्यपाल कार्यालयाने विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून एका राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीचे नाव कळविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद सदस्य व विद्या परिषदेच्या सदस्यांना येत्या १० जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या संयुक्त बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे. सर्व सदस्यांकडून येणाऱ्या नावांमधून एका व्यक्तीचे नाव कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेसाठी सुचविले जाणार आहे.
राज्य शासनातर्फे विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याबाबतचे विधेयक नुकतेच हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आले. कुलगुरू निवड प्रक्रियेत अधिकार आणि प्र -कुलपती म्हणून उच्च शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती यावरून शिक्षण क्षेत्रात जोरदार चर्चा झाली. विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची निवड व्हावी याबाबत राजकीय हस्तक्षेप नसावा, असे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राजकीय हस्तक्षेपाने कुलगुरूंची निवड केली जाते, असे आरोप केले जात आहेत. त्यामुळे विद्यापीठातील सदस्यांकडून कोणत्या व्यक्तीचे नाव सुचविले जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.