पुणे : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) प्राप्त झालेल्या निधीतून सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठ आवारात सुमारे १२ लाख लिटर क्षमतेचा सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत होणार असून पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरील ताणही कमी होणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच विविध विभागांना दररोज दहा ते बारा लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. पालिकेच्या पाणी पुरवठा केंद्रातून विद्यापीठ आवारातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून त्याचा वापर विद्यापीठ प्रशासनातर्फे केला जातो. तसेच विद्यापीठातील विविध उद्यानांमधील झाडांना तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारती मागील हिरवळीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, काही कारणास्तव पालिकेकडून एक किंवा दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो किंवा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जातो. त्यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी टँकर मागविले जातात. परंतु, यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून विद्यापीठाने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील म्हणाले, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या डेÑनेज लाईनमध्ये जाणारे पाणी थांबेल. परिणामी पालिका प्रशासनाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर येणारा ताण काही प्रमाणात कमी होईल. प्रक्रिया केलेले पाणी उद्यानासाठी व स्वच्छतेसाठी वापरले जाईल. सध्या उद्यानांसाठी व नवीन इमारतींच्या बांधकामासाठी सुमारे ३५ बोअरवेलचे पाणी वापरले जात आहे. मात्र, प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध झाल्यानंतर बोअरवेलचा वापर बंद करता येईल. त्यामुळे भूमिगत जलसाठ्याचा उपसा थांबेल.विद्यापीठातर्फे येत्या महिना अखेरीस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठीची निविदा काढली जाणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पातून सुरुवातीला १२ लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया करता येईल.>पालिकेकडून पाणी घेणार नाहीपुढील काळात या प्रकल्पाची क्षमता १५ लाख लिटरपर्यंत वाढवली जाईल. प्रकल्पामुले दररोज दहा लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया होईल. त्यामुळे विद्यापीठाला पालिकेकडून अधिक पाणी घ्यावे लागणार नाही, असेही विद्यापीठातील कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठात सांडपाण्यावर प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:20 AM