सासवड : श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे गुरुवारपासून (दि. २०) दत्तजयंती सोहळ्याला सुरुवात झाली. हिवरे (ता. पुरंदर) येथील आजोळघरातून पायी आलेल्या दिवा व ज्योतीचे गुरुवारी (दि. २०) दुपारी नारायणपुरात नारायणमहाराज यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर दत्त मंदिरात दत्तमहाराजांच्या पादुका फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात येऊन पालखीची मंदिरास ग्रामप्रदक्षिणा झाली. मिरवणुकीत टाळ-मृदंग, ढोलपथक याचा समावेश होता. पालखी ४ वाजता २०० कोटी यज्ञकुंडस्थळी पोहोचली. येथे होमहवन, पुष्पवृष्टी, होमप्रदक्षिणा, पूणार्हुती, आरती व हजारो दीपप्रज्ज्वलन करून २०० कोटी यज्ञकुंडाच्या अठरावा वर्धापनदिन फटाक्यांची आतषबाजी करीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. दि. २१ डिसेंबरला सायं. ७ वा. ३ मिनिटांनी श्री दत्तजन्म सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. २२ डिसेंबरला दत्तजयंती सोहळ्याचा तिसरा दिवस. या दिवशी नारायणमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीची सवाद्य ग्रामप्रदक्षिणा झाली. तसेच चंद्रभागा कुंडाचे पूजन होऊन त्यानंतर उत्सवमूर्ती व पादुकांना विधिवत स्नान घालण्यात आले. यावेळी ‘‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’’चा जयघोष करण्यात आला.दत्तजयंती सोहळ्याचा शेवटच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता मंदिरात आरती होऊन उत्सवमूर्ती व पादुकांना फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आले. त्यानंतर मंदिरातून पालखीने ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवले. पालखी मंदिराबाहेर आल्यानंतर पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी तुतारी व श्रीपाद वल्लभ दिगंबरा गजराने सारा परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत पालखीपुढे छबिना, ढोल-लेझीम पथक, बँड पथक, भजन पथक आदींचा यात समावेश होता. तसेच पताका, अब्दागिरीसमवेत भगव्या वेशातील सेवेकऱ्यांमुळे सारा परिसर भगवामय झाला होता.मिरवणूक सकाळी ११ वाजता चंद्रभागा कुंडावर आल्यावर तेथे फुलांनी सजविलेल्या ओट्यावर पालखी विसावली. नारायणमहाराज यांच्या हस्ते विविध तीर्थक्षेत्रांहून आणलेले पाणी चंद्रभागा कुंडात सोडून त्यानंतर फुले, पुष्पहार, ओटी, फळे अर्पण करण्यात येऊन त्याची पूजा करण्यात आली.उत्सवमूर्ती व पादुकांना चंद्रभागास्नान घातले. त्यानंतर यांचे विधिवत पूजन करण्यात येऊन पुन्हा उत्सवमूर्ती व पादुकांना पालखी ठेवण्यात आले. पालखी वाजतगाजत मंदिरात आली. मंदिरात नारायणमहाराज यांचे प्रवचन होऊन आरती झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे उत्सवमूर्तीची मिरवणूक व पादुकांना चंद्रभागास्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:26 AM