घोडेगाव : कोथिंबीर जुडीला बाजारभाव नसल्याने मंचर बाजार समितीमध्ये अवघा दोन रूपये भाव मिळाला. बाजार पडल्याने शेतकऱ्यांना कोथिंबीर बाजारात आणण्याऐवजी उभ्या पीकातच जनावरे खाण्यासाठी सोडली.कांदा, बटाटयाला भाव नसल्याने अगोदरच शेतकरी मेटाकूटीस आला आहे. मध्यंतरी मेथी, कोथिंबीरीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी याची लागवड मोठया प्रमाणात केली. हे पीक कमी कलावधी मध्ये व कमी पैशात येणारे असल्याने अनेकांनी घेतले. त्यात आंबेगाव, जुन्नर तालुक्यात नदी, कालवा याव्दारे पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी या पिकाकडे वळला. तसेच सध्या थंडी असल्याने या पीकाला पोषक वातावरण मिळाले त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे बाजार भाव गडगडले. मंचर बाजार समितीमध्ये कोथिंबीरीच्या दर्जानूसार २ ते ४ रूपये जुडी तर मेथीला २ ते ५ रूपये भाव मिळाला. बाजारभाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर विक्रीसाठी आणलीच नाही. काही शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकातच जनावरे चरण्यासाठी सोडली तर काही शेतकऱ्यांनी यावरून रोटर फिरुन जमिनीत गाडून टाकले.एकीकडे दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. मात्र नदी आणि कालव्यामधील आवर्तनामुळे शेतकºयांनी कोथिंबीरीचे उत्पादन घेतले खरे मात्र बाजारसमितीमध्येच त्याचे भाव पाडले गेले. त्यामुळे बाजार समितीकडून याबाबत निश्चित धोरण ठरवले गेले पाहिजेत. उत्पादन आणि वाहतुक यांचा खर्चाचा हिशेब घालूनच शेती उत्पन्नाचा भाव ठरवावा, दलालीचा प्रकार बंद करून थेट शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा यापुढे कोथिंबीरीचे उत्पादन बंद करण्याची वेळ येईल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उत्पादन खर्चही निघेना; शेतकऱ्यांनी कोथिंबिरीच्या शेतात सोडली जनावरं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 2:02 AM