पुणे : यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून, राज्यातील १९४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यातील ३२ कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. बुधवार अखेरीस (दि. ३१) ४.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.राज्य सरकारने २० आॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार साखर आयुक्तालयाकडे १०० सहकारी आणि ९४ खासगी कारखान्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. राज्यात सरासरी हेक्टरी ८८ टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल ११६ टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी ९५२ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले. या वर्षीच्या (२०१८-१९) हंगामातही ९४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. त्यातून साखरेचे उत्पादन १०६ ते १०७ लाख टनादरम्यान असेल. यंदा खोडवा उसाचे प्रमाण ६० टक्के असल्याने सरारी ९० टन प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तसेच यंदाच्या हंगामात ११.६२ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा हे प्रमाण २.६० लाख हेक्टरने अधिक आहे. १०६ ते १०७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. यंदाच्या हंगामात राज्यातील साखर उत्पादन अंदाजापेक्षा १५ ते २० टक्क्यांनी घटणार आहे. त्यातच हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकताही घटणार असल्याने आठशे ते साडेआठशे लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. त्यातून ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.एफआरपी थकविलेल्या कारखान्यांचा परवाना रोखलाउसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) थकविलेल्या २९ कारखान्यांचा परवाना रोखला असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. राज्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या आठ वर्षांपासूनची तब्बल ४५४ कोटी ८५ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम थकीत आहे. यातील २२१ कोटी ५९ लाख रुपयांची थकबाकी गेल्या वर्षीच्या हंगामातील आहे.
पावणेपाच लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 1:52 AM