पुणे : सांगली, कोल्हापूरचा पूर आणि नाशिक, पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका कांदा उत्पादनाला बसला आहे. यामुळे गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात कांद्याची आवक कमी झाली आहे. याचा फटका दराला बसला असून, गेल्या दोन दिवसांत काद्याच्या दरात प्रतिकिलाे मागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. दर वाढल्याने शेतकरी वर्गात उत्सहाचे वातावरण आहे. परंतु शहरी ग्राहक दर वाढीच्या भितीने धास्तवला आहेत. रविवार (दि.१५) रोजी मार्केट यार्डात घाऊक बाजारात प्रती दहा किलोसाठी २८० ते ३२० रुपये दर मिळाला. तर हेच दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो मागे ३० ते ३५ रुपये किलो पर्यंत गेला आहे.
गुलटेकडी मार्केटयार्डात रविवार (दि.१५) रोजी सुमारे १०० ते १२५ ट्रक इतकी कांद्याची आवक झाली. राज्यातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा भिजलेला आहे. तसेच नवीन कांद्याची लागवड देखील धोक्यात आली असून, सद्यस्थितीत फक्त ३० जुन्या कांद्याचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतकरी वर्ग बाजारपेठांमधील होणारी आवक व दरांमध्ये होणारी सातत्याने वाढ विचारात घेवूनच कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत. त्यामुळे मार्केटयार्डात कांद्याच्या दरात प्रतिकिलोसाठी दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. सलग दोन सुट्ट्या असल्याने सुमारे १२५ ट्रक आवक झाली तरी देखील मागणी वाढल्यामुळे प्रतिदहा किलोस २८० ते ३२० रुपये भाव मिळाला. आठवड्यात सरासरी ५० ते ६० ट्रक इतकी दररोज आवक होत असून कांद्याचे दर दररोज वाढतच चालले आहेत.
राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातील साठवून ठेवलेला कांदा जवळपास संपत आला आहे. तसेच आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात देखील नवीन कांद्याची तुरळक आवक होत आहे. त्यामुळे या राज्यांमधून महाराष्ट्रातील जुन्या उच्च प्रतिच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
दोन महिन्यात दर आणखी वाढणारराज्यात प्रामुख्याने कांद्याचे पिक घेणा-या भागातच पूर, अतिवृष्टी झाली. याचा मोठा परिणाम कांदा पिकावर झाले आहे. याचा परिणाम सध्या मार्केटमध्ये मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. तसेच पावसामुळे खराब दर्जाचा माल देखील अधिक प्रमाणात येतो. राज्यात प्रामुख्याने केरळ, कर्नाटक या भागातून देखील कांदा विक्रीसाठी येताे. परंतु या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने येथून येणारी आवक देखील घटली आहे. यामुळेच काद्यांच्या दराममध्ये वाढ झाली असून, येत्या दोन महिन्यांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.- रितेश पोमण, कांदा व्यापारी