पुणे: पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असताना काम नीट न करणा-याला मी लगेच शिवी हासडायचो. त्यामुळे काम पटकन होते असे लक्षात आल्यावर तिचं माझी सवय बनली. पण आपण दिलेली शिवी कुणी लक्षात ठेवेल असे वाटले नव्हते. सात वर्षांनी तो व्यक्ती भेटल्यावर त्याच्या मानत माझी आजही तीच प्रतिमा आहे हे लक्षात आल्यानंतर खूप वेद्ना झाल्या आणि आपल्या नकळतही आपण किती हिंसा करतो हे जाणवल्यावर त्यावर काहीतरी करण्याच्या जाणीवेतून हा चित्रपट तयार झाला असल्याची प्रांजळ कबुली दिग्दर्शक सुजय डहाके यांनी दिली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’ चित्रपटाचे सादरीकरण झाले. त्यानिमित्त पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी निर्माती मेघना प्रामाणिक उपस्थित होत्या.. चित्रपटाविषयी सांगताना सुजय डहाके म्हणाले, वडिलांच्या सरकारी नोकरीच्या नियमित बदलीमुळे अविनाश शहरातून एका दुर्गम भागातील खेड्यात बदली होऊन जातो. तेथे गेल्यावर शाब्दिक हिंसेच्या खेळात तो अडकतो. या संकल्पनेभोवती ‘तुझ्या आईला’ हा चित्रपट फिरतो. शिवी देणे किंवा शब्दांनी इजा पोहचविणे ही गोष्ट फार सामान्य समजली जाते. शारीरिक हिंसे विषयी खूप बोलले जाते मात्र शाब्दिक हिंसेविषयी मराठीत तरी अजून कोणी बोललेले नाही. म्हणून या संकल्पनेवर चित्रपट बनविण्याचे ठरवल्याचे सांगून डहाके म्हणाले, खेडयात, होस्टेलमध्ये अशा शिव्या देण्याचा खेळ खेळला जातो. बरेच शिक्षकही मुलांशी बोलताना अशाच पद्धतीच्या भाषेचा वापर करतात. त्यामुळे या शाब्दिक हिंसेचे धडेही शाळेतूनच मुले गिरवू लागतात. याविषयी विचार होणे ते थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे चित्रपटात अशी शाब्दिक व शारीरिक हिंसा काही प्रमाणात दाखविली असली तरी शेवटी संदेश अहिंसेचा दिला आहे. शिवाय हा चित्रपट स्त्रीवादाकडे झुकणारा असून, शिवी कायम आई आणि बहिणीवरूनच का असते? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. यापूर्वी शाळा चित्रपट ‘पिफ’ मध्ये दाखविण्यात आलाय. त्यानंतर परत ‘पिफ’ मध्ये यायला तब्बल ९ वर्षांचा काळ लोटला. मात्र यंदा तरी आपला चित्रपट या महोत्सवात पोहचू शकल्याचा आनंद डहाके यांनी व्यक्त केला.
दिलेल्या एका शिवीने सात वर्ष लक्षात राहिलो, याच वेदनेतून ‘तुझ्या आईला’ चित्रपटाची निर्मिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 6:56 PM
शिवी कायम आई आणि बहिणीवरूनच का असते?
ठळक मुद्दे शिवी देणे किंवा शब्दांनी इजा पोहचविणे ही गोष्ट फार सामान्य समजली जातेशारीरिक हिंसेविषयी खूप बोलले जाते मात्र शाब्दिक हिंसेविषयी मराठीत अजूनतरी अंधारच