विद्याशाखा कोणतेही असो किंवा विषय कोणताही असो, सर्व महाविद्यालयीन व्याख्यात्यांना १८ ते २३ या वयोगटातील विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखता आली पाहिजे. म्हणून उच्च माध्यमिक पर्यंतच्या शिक्षकांना जशी बी.एड. सारखी पदवी आवश्यक आहे, तशीच एखादी पदवी महाविद्यालयीन व्याख्यात्यांना सुद्धा गरजेची वाटते. शिक्षणाचा इतिहास, अध्यापन कौशल्य, संवाद कौशल्य, तसेच विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र ओळखण्याचे कौशल्य इत्यादी विषयांचा सदर पदवीमध्ये समावेश केला तर उपयुक्त ठरेल.
मुळातच सेट किंवा नेट, एम. फिल., पीएच.डी., यासारख्या उच्च शैक्षणिक पात्रता असताना पुन्हा वेगळ्या पदवीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु, नेट-सेट उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचणारे अध्यापन त्यांना करता येईलच असे नाही. कारण, प्रभावी अध्यापन हे कोणत्या पदवीवर अवलंबून नसते तर ते जाणीवपूर्वक आत्मसात केलेले कौशल्य असते. म्हणूनच उच्च शैक्षणिक पात्रता आत्मसात केलेल्या सर्वच व्याख्यात्यांना प्रभावी अध्यापन करता येईलच, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
प्रभावी अध्यापनात अभ्यास विषयाचे पुरेपूर ज्ञान व्याख्यात्यांना जितके आवश्यक असते, तेवढेच समोरच्या विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य सुद्धा त्याच्याकडे हवे. यामध्ये विद्यार्थ्यांचा मनोभाव नेमका समजणे फार महत्त्वाचे असते. तो समजल्यावरच व्याख्यात्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल.
तज्ज्ञांच्या समितीतर्फे विषय ज्ञान आणि त्या उमेदवाराचे शिक्षणाबाबतचे त्याचे स्वत:चे मत, इतर छंद, बाह्य वाचन याबाबी मुलाखतीद्वारे तपासता येतील. त्याची देहबोली, त्यातून प्रकट होणारी सकारात्मकता, आत्मविश्वास, नजरफेक याबाबी चर्चेच्या दरम्यान निरीक्षणातून पारखता येतील. थोड्याबहुत प्रमाणात या सर्व बाबी आजही अस्तित्वात आहेत.
प्रभावी अध्यापन हे एक कौशल्य असल्याने या कौशल्याची चाचणी यापुढे वर्गातच घेण्यात यावी. पात्र उमेदवारांना मुलाखतीच्या पत्रासोबतच त्याच्या विषयातील तीन विषय देण्यात यावेत. सदर उमेदवाराची चर्चा मुलाखत झाल्यावर त्याला या तीनपैकी एक टॉपिक साधारणपणे एक तास अगोदर देण्यात यावा. ज्या वर्गावर उमेदवाराची अध्यापन कौशल्य चाचणी होणार आहे तो वर्ग जाणीवपूर्वक सर्व साधारण, मध्यम आणि उत्तम गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा असावा. त्याच्या त्या अध्यापन कौशल्य चाचणीचे पूर्ण चित्रीकरण करण्यात यावे. या सर्व गोष्टी सध्या प्रचलित असणाऱ्या कायद्याच्या चौकटीत राहून सहज करता येतील.अशा प्रकारच्या अध्यापन कौशल्य चाचणीला कोणतीही सूज्ञ व्यक्तीविरोध करणार नाही. यानंतर निवड समितीचा अहवाल हा सुस्पष्ट असावा. संबंधित उमेदवाराने मागणी केल्यास या संपूर्ण प्रक्रियेची चित्रफित त्याला सुपूर्द करण्यात यावी. वरील सर्व प्रकारामुळे सामाजिक न्यायाचे संपूर्ण भान ठेवूनही केवळ उच्च शिक्षणाचा दर्जा हा आबाधित राखला जाईल.
या प्रकारच्या निवडलेल्या प्रभावशाली व्याख्यात्यामध्ये आवश्यक आणि अत्यावश्यक कौशल्याबरोबरच गतिशील कौशल्य स्वीकारण्याची आत्मीयता नक्की राहील. असेच शिक्षक युवा-युवतींना योग्य न्याय देतील याविषयी दुमत नाही. - डॉ.अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
--------------------