पुणे : राज्यातील हजारो प्राध्यापकांच्या जागा सध्या रिक्त आहेत. कोरोनामुळे यंदाही प्राध्यापक भरती प्रक्रिया रखडली आहे. मात्र, त्याचा फटका राज्यातील विद्यार्थ्यांना बसत आहे. तसेच राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्राध्यापक भरतीबाबत गांभीर्याने विचार करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी घोषणा केली होती. प्राध्यापक भरतीबाबत निर्णय घेतला नसला तरी राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने सकारात्मक पाऊल उचलले. परंतु, रोस्टर तपासणी, मराठा व मुस्लिम आरक्षण, आकृतिबंध, अशा विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून प्राध्यापक भरती होऊ शकली नाही. अनेक महाविद्यालयांमध्ये काही विषयांसाठी एकही पूर्णवेळ प्राध्यापक नसल्याचे समोर आले. त्यामुळे कमीत कमी ही पदे प्राधान्याने भरण्याबाबत शासन विचार करीत आहे. परंतु, अद्याप याबाबतची अंमलबजावणी सुरू केली नाही. कोरोनामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्णपणे राबविणे महाविद्यालयांना शक्य झाले नाही. तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे काही महाविद्यालयांकडून एक वर्गात अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. त्यामुळे पात्रता असूनही अनेक उमेदवार बेरोजगार आहेत.
दरवर्षी सर्वसाधारणपणे जून महिन्यात प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी मे महिन्यात शैक्षणिक संस्थांकडून जाहिराती प्रसिद्ध करून उमेदवारांकडून अर्ज मागविले जातात. परंतु, याबाबत कुठल्याही हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही प्राध्यापक भरती प्रक्रिया रखडणार, असे बोलले जात आहे.
--
राज्यातील महाविद्यालयांमध्ये सुमारे ५० टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शासन काही पदे भरण्याबाबत सकारात्मक दिसत असले तरी त्याबाबतची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही.
- एस. एम. राठोड, अध्यक्ष, पुटा