जबाबदार मंत्र्याकडून बेजबाबदार वक्तव्य : भरती अशक्यच
राहुल शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने प्राध्यापक भरती शक्यच नाही. त्यामुळे प्राध्यापक पद भरतीसाठी आंदोलन करण्यापेक्षा कोंबड्या किंवा डुकरं पाळण्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करा,” असा अजब सल्ला राज्याच्या एका जबाबदार मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या प्राध्यापकांना दिला आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या प्राध्यापकांच्या मनात आत्महत्येचा निराशजनक विचार डोकावत असल्याचे प्राध्यापक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ४० हजारांहून अधिक पूर्णवेळ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. शासनाने स्वीकारलेल्या चुकीच्या धोरणांमुळे, वेळोवेळी जाहीर केलेल्या आरक्षणाच्या निर्णयामुळे आणि न्यायालयाने त्यास दिलेल्या स्थगितीमुळे भरती प्रक्रिया लांबत गेली. मात्र, त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक झाली. एकाच महाविद्यालयात एकसारखे काम करणाऱ्या दोन प्राध्यापकांच्या वेतनात जमीन-आसमानचा फरक झाला. पूर्णवेळ काम करणाऱ्या प्राध्यापकाचे वेतन एक ते दीड लाखापर्यंत असून तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांना १५ हजार रुपयांवर काम करावे लागले आहे.
राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरती करावी, अशा सूचना वेळोवेळी विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान व नॅकने प्राध्यापक भरती करण्याबाबत राज्य शासनाला दिल्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. याच मुद्यांच्या आधारे विविध प्राध्यापक संघटना भरतीसाठी राज्यभर आंदोलन करत आहेत.
चौकट
प्राध्यापक कोणी वेटर, कोणी मजूर
ज्ञानदानाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांना उपजीविकेचा प्रश्न भेडसावत आहे. कोरोनाकाळात तर अनेकांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून, अनेकांनी शेतमजूर म्हणून तर पेट्रोलपंपांवरही काम करावे लागले. बुधवारी पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात तासिका तत्त्वावरील पदांच्या भरतीसाठी मुलाखती झाल्या. त्यावेळी शासन व संस्थाचालकांकडून होणाऱ्या पिळवणुकीचा पाढा अनेकांनी वाचला. ‘या क्षेत्रात येऊन मोठी चूक केली. उदरनिर्वाहासाठी आता कोणतेही साधन उरले नाही. त्यामुळे आत्महत्येचा विचार मनात डोकावून जातो,’ अशी उद्विग्न भावना एका उमेदवाराने व्यक्त केली.
चौकट
गांधी जयंतीला आंदोलन
“प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत राज्याच्या एका वरिष्ठ मंत्र्याने आम्हाला कोंबड्या व डुक्कर पालनाचा सल्ला देऊन प्राध्यापकांचा अपमान केला. तब्बल ६० दिवस आंदोलन करूनही शासनाने भरतीबाबत ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे येत्या २ ऑक्टोबरला उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करणार आहोत.”
- डॉ. संदीप पाथ्रीकर ,अध्यक्ष, नव प्राध्यापक संघटना