बारामती - महाराष्ट्र प्राध्यापक संघ (एमफुक्टो)च्या आदेशान्वये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील स्थानिक शाखेने विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले आहे.प्राध्यापक प्रवेशद्वारावर बसुन असल्याने महाविद्यालयातील अध्यापनावर परीणाम झाला आहे.हे आंदोलन बेमुदत असल्याने महाविद्यालये नेमकी सुरु केव्हा होणार असा प्रश्न विद्यार्थी वर्गाला पडला आहे.सोमवारी (दि २५) मुंबई येथे मंत्रालयात यासंदर्भात रात्री ऊशीरापर्यंत बैठक सुरु होती.या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर पुढील आंदोलनाचा निर्णय होणार असल्याचे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुनील लोखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.त्यामुळे महाविद्यालय केव्हा सुरु होणार,हा विद्यार्थ्यांचा प्रश्न अनुत्तरीतच आहे. संघटनेच्या मागण्यांनुसार राज्यातील महाविद्यालयांमध्ये ११ हजार ५०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे इतर शिक्षक, प्राध्यापकांवर त्याचा ताण येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने नोकर भरतीवरील बंदी त्वरित उठवावी. युजीसी, रूसाच्या नियमाप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व रिक्त पदे पूर्णवेळ त्वरित भरावीत, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील महाराष्ट्र प्राध्यापक संघ (एमफुक्टो) ने ११ सप्टेंबर रोजी एकदिवशीय कामबंद आंदोलन केले.त्यानंतर देखील शासनाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने महाविद्यालयांमध्ये आज शुकशुकाट जाणवला. बेमुदत कामबंद आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा एमफुक्टोने दिला आहे.याबाबत बारामती येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सर्व प्राध्यापक बसुन होते.संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुनिल लोखंडे,संघटनेचे ज्येष्ठ सभासद प्रा.एम के कोक रे,प्रा. एस आर काळे,प्रा.डॉ संदीप तारळेकर,प्रा.डॉ शशांक माने,प्रा.डॉ भगवान माळी यांनी मनोगत व्यक्त केले.या आंदोलनास विविध राजकीय पक्ष,तसेच संस्था चालक व प्राचार्य संघटनांनी पाठींबा व्यक्त केला आहे.निवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ डी बी जगताप यांच्यासह अन्य निवृत्त प्राध्यापकांनी आंदोलनाच्या ठीकाणी येउन प्राध्यापकांची भेट घेतली.तसेच आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला.
महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट, प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 2:08 AM