स्पर्धा आणि धक्काधकीच्या जीवनात माणूस आनंद हरपून बसला आहे. ताणामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी माणसाने आपल्या कामकाजाच्या चाकोरी व्यतिरिक्त स्वत: च्या आरोग्य आणि प्रगतीसाठी कलात्मक छंद जोपासणे गरजेचे आहे, कलात्मक अविष्कारामुळे माणूस ताणतणावातून काही काळ मुक्त राहू शकतो. यासाठी संगीताची आवड गरजेची आहे, असे मत वैद्यकिय क्षेत्र सांभाळून कलाक्षेत्रात कामकाज करणारे डॉ. विकास वैद्य यांनी व्यक्त केले.डॉ. विकास वैद्य म्हणाले, संगीत शास्त्र हा असा एक कलात्मक अविष्कार आहे. ज्यामुळे माणूस स्वत:चे दु:ख बाजूला सारुन या कलाविष्कारात समरस होत असतो. मला बालपणापासूनच संगीत शास्त्र आणि मूर्ती बनविण्याचा छंद होता. या छंदामुळे मला आनंद मिळतोच, परंतु या आनंदाचा अंर्तभाव इतरांच्या जीवनात सहभागी व्हावा म्हणून पाटस (ता.दौंड) सारख्या छोट्या गावातून कलावंतांना मोफत संगीतशास्त्रांचे धडे देत आहेत.हार्मोनियम, तबला आणि गायन या तिन्ही कला अवगत असल्याने या कला तरुणांना अवगत करण्यासाठी प्रेरित करीत असतो. छोट्या मोठ्या मैफलीतून या नवोदित कलावतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कामकाज करत आहे. एखाद्या कलावंताला घडविणे यासारखा दुसरा कुठला आनंद नाही. भारतीय संगीत समृद्ध असून या संगीताला पूरातन काळापासून राजाश्रय आहे. शास्त्रीय गायन किवा पाश्चात्य संगीत या शास्त्रात भाषेत फरक असेल परंतु संगीतातील उद्दिष्ट एकच असते. आम्हाला आजोबापासून संगीताचा वारसा आहे. बुवासो पवार, पं. गवारे, पं. डॉ. विकास कशाळकर, मंजुषा पाटील यांच्याबरोबर माझे काका आणि गुरुजी पं. शरद करमळकर यांचे मार्गदर्शन मिळाले आणि मिळत आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये लय, सूर, संगीत असतेच फक्त आपल्याला ज्ञात व्हावे लागते. नवीन पिढीमध्ये एकदम मोठे नाव व्हावे असे वाटते . परंतु, संगीत शिकण्याकरिता गुरुंचे मार्गदर्शन, साधना आणि संगीताविषयी निष्ठा असणे आवश्यक आहे. संगीत कलेला मेहनत आणि सराव याशिवाय कुठलाही शॉर्टकट नाही. हे कलावंतांनी लक्ष्यात घेतले पाहिजे. शास्त्रीय गायन अवघड असते, असा चुकीचा समज समाजात आहे. परंत, त्याचे थोडेजरी ज्ञान झाले असले तर कलाकार शास्त्रीय संगीत सोडून गाणार नाही. या व्यतिरिक्त सुगम संगीत देखील सर्वश्रेष्ठ संगीत आहे. सुगम संगीतात बबनराव नावडीकर, गजानन वाटवे, सुधीर फडके, किशोर कुमार यांची गाणे आजही अजरामर आहेत. संगीत क्षेत्र मनाला आनंद देणारे क्षेत्र आहे. समृद्ध भारतीय संगीत नवीन पिढीमध्ये रुजविण्याचे काम ज्येष्ठ संगीतकारांनी निस्वार्थीपणे करावे. नवीन नवीन कलाकार समाजापुढे उभे करावेत, की जेणेकरुन भारतीय संगीत अजरामर राहिल.पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राग आणि आजार’ यांचे तीन दिवस शिबिर घेतले होते. या शिबिारात संगीत रागांचा रोगांवर सकात्त्मक परिणाम दिसून आला. यावरुन आजार बरा करण्यासाठी कलात्मक संगीताची जोड ही महत्वाची ठरु शकते, असा माझा एकंदरीत अनुभव आहे. कारण कलात्मक क्षेत्राबरोबरीने वैद्यकिय क्षेत्रात देखील कामकाज आहे. त्यानुसार निद्रानाश, मानसिक ताणतणाव या आजारावरती बागेश्री, दरबारी कानडा, यमन, मालकंस, अभोगी या रागांचा उपयोग होताना दिसून आला. उच्च रक्तदाब, मधुमेह या रोगावरती पुरीया -धनाश्री- तोडी या रागांचा उपयोग होतो. एकाग्रता वाढविण्यासाठी भीमपलास तर आस्थमा सारख्या आजारावर मीयॉ मल्हार हा राग उपयुक्त पडतो.
आरोग्य, प्रगतीसाठी संगीतशास्त्र लाभदायक
By admin | Published: May 08, 2017 2:31 AM