पुणे : कोरोना संकटामुळे सर्वच व्यवसायांना फटका बसला आहे. याला चित्रपट किंवा नाट्यक्षेत्रही अपवाद नाही. पडद्यावर चकाकणाऱ्या चेहऱ्यामागे हजारो हात राबत असतात. मात्र, पडद्यामागच्या कलाकार व त्यांच्या कुटुंबीयांवर कोरोनाकाळात हलाखीची परिस्थिती ओढावली आहे. निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा. म्हणजे संकटकाळात हा निधी उपयुक्त ठरेल, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुलमाधव फाउंडेशनच्यावतीने १०० कलावंताना अन्न धान्यासह संसारोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
माझे चित्रपट यशस्वी झाले. त्यामागे पडद्यामागच्या कलाकारांचा मोठा हातभार आहे. माझ्या परीने मी त्यांना मदत करत आहे. मात्र संकटकाळासाठी कायमस्वरूपी मदत निधी उभा करणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने पडद्यामागील कलाकारांचा विचार करून अन्य राज्यांप्रमाणे मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी तरडे यांनी केली.
प्रसिद्ध गीतकार व शांताबाई या गाण्यामुळे लोकप्रिय झालेले कलावंत संजय लोंढे यांना ही धनादेश व एक महिन्याचे रेशन अशी मदत देण्यात आली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी, शिक्षण समिती अध्यक्ष व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,मुकुलमाधव फाउंडेशनचे मोकळे, यास्मिन शेख उपस्थित होते.
यावेळी रमेश परदेशी यांनी कोरोना संकटकाळात कलाकाराला लोकाश्रय मिळत आहे पण राजाश्रय कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला. तसेच, प्रवीण तरडे यांनी लॉकडाऊन काळात तब्बल १४ लाख रुपये पडद्यामागील कलावंतांसाठी दिले. हा कित्ता इतरांनी ही गिरवावा असे सांगितले.
संदीप खर्डेकर म्हणाले की, कलाकार हा वर्षभर आपले मनोरंजन करत असतो त्याच्या मेकअपआड त्याचे दुःख लपवून तो फक्त प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आणि कौतुकाचा भुकेला असतो. मात्र या काळात नाटके, चित्रपट व मालिकांना मोठा फटका बसला असून अनेक कलावंत जगण्यासाठी धडपडत आहेत. अशावेळी त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे.