खाजगी रुग्णालयात लसिकरणाला सुरुवात झाल्यानंतर तिथे अनेक नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे. मात्र यातल्या अनेक रुग्णालयाकडून ६०० रुपयांना मिळणारी लस नफेखोरी करून विकली जात असल्याचा आरोप आता होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ने आता याबाबत पावलं उचलत किमतीमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हणले आहे.
पुण्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. खाजगी रुग्णालये लसी थेट विकत घेऊन हे लसीकरण करत आहेत. महापालिका लस मिळत नसताना खाजगी रुग्णालयात कडे नागरिकांचा ओढा पाहायला मिळत आहे. अगदी काही रुग्णालयांमध्ये तर अक्षरशः नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली होती.
मात्र यामध्ये अनेक रुग्णालयाकडून लसीकरणासाठी भरमसाठ रक्कम आकारली जात आहे. यातली अनेक रुग्णालये कोव्हीशिल्ड देत आहेत. ही लस त्यांना सहाशे रुपयांना लस मिळत असताना साधारण पणे ९०० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात आहे. कंपन्यांमध्ये लसीकरण करण्यासाठी तर सरसकट १२०० रुपयांची रक्कम मागितली जात आहे.
अधिकाऱ्यांकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत कोणतेही कार्टेल करू नये अशा सूचना अधिकाऱ्यांनी रुग्णालयांना दिल्या आहेत. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन कडे देखील किंमती बाबत गाईडलाईन आखून द्याव्यात अशी मागणी केली जात आहे. याबाबत लोकमतशी बोलताना आयएमए चा हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया च्या पुणे विभागाचे संचालक डॉक्टर संजय पाटील म्हणाले " रुग्णालयाने साधारण लसीची किंमत तसेच त्याबरोबर लागणारे कर्मचारी आणि तसेच इतर यंत्रणा लक्षात घेऊन किमती निर्धारित कराव्यात. ही सरसकट रक्कम आय एम ए ने ठरवून द्यावी अशी मागणी आमचा कडे केली जात आहे. आम्ही याबाबत विचार करत आहोत.या बाबी लक्षात घेऊन किंमत ठरवावी अशी आमची भूमिका आहे. मात्र याबाबत सर्वच रुग्णालये आय एम ए ची भूमिका मान्य करतील असेही नाही. स्टोरेज तसेच कर्मचाऱ्यांसाठी येणारा खर्च धरता लसी मागे ९०० रुपये आकारणे योग्य आहे. तसेच कॉर्पोरेट लासिकरणासाठी तिकडे टीम नेण्यासाठीचा खर्च गृहीत धरण्यात येतो "