पुणे : एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी आहे असे आपण सर्वार्थाने म्हणतो. अनेक पुरोगामी विचारवंत झाले, पण त्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आला नाही. तसे झाले असते तर आज ज्या टोकेरी जातीय अस्मिता आहेत, त्या आज राहिल्या नसत्या. आपापले तळ आणि झेंडे उभारून लोक संवाद साधायला कडवेपणाने प्रतिकार करीत आहेत ते दिसले नसते, अशा शब्दांत नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ढेरे यांचा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत, संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर उपस्थित होते.डॉ. ढेरे म्हणाल्या, प्राचीन मराठी साहित्य संस्कृतीमध्ये अनेक विचारधारा निर्माण झाल्या, विद्रोह झाले, आक्रोश झाले, या सगळ्यांना सामावून घेत ही संस्कृती चालत आली आहे. ती मनुष्यकेंद्रित करणे, मूल्य अधोरेखित करत जाण्याचे काम विचारवंतांनी केले आहे. नवता आणि परंपरा यांचा संघर्ष होत आला आहे. काळानुरूप जुन्या गोष्टी मागे टाकाव्याच लागतात. टाकाऊ आहे ते टाकावेच लागते आणि टिकाऊपणाशी नाळ जोडावी लागते. संस्कृती टिकाऊ तशी टाकाऊ आहे. विद्रोहालादेखील एक परंपरा आहे. नव्या विचारांना आणून लोकांनी विद्रोहच केला आहे. विद्रोहासाठी विद्रोह कधीच नव्हता.भक्तीचळवळ हा सर्वांत मोठा विद्रोह होता. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जे केले त्यातून हे दिसेल. आधीची ज्ञानव्यवस्था बदलायची होती. भाषेला पूरक नवसाहित्य दिले. ही परंपरा आपल्याकडे असताना आजच्या काळात याचा विचार कसा करणार आहोत, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. पुरोगामी विचारवंत झाले पण त्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आला आहे असे दिसत नाही. लोक डोंगराएवढे काम करतात, पण त्यांचे विचार मागे टाकून पुढे जात असल्याची खंत व्यक्त केली.संस्थेकडून कात टाकण्यास सुरवातभांडारकर संस्थेने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. दार उघडून लोकांना आत घेण्यास सुरुवात झाली आहे, असा टोला माधव भांडारी यांनी लगावला. देशात ज्ञान कुणाला दाखवायचे नाही, अशी पद्धत पडली होती. परकीयांच्या आक्रमणामुळे ज्ञान संपुष्टात आले.स्वकीयांमुळे नष्ट झालेल्या ज्ञानाचे काय, असा सवाल त्यांनी केला. गेल्या काही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दिसले नाही ते मराठी साहित्याचे, लोकसाहित्याचे विवेचन यंदा ऐकायला मिळेल, अशी टिप्पणी ढेरे यांनी केली.
पुरोगामी विचार पचवला नाही - डॉ. अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 2:02 AM