सध्या राज्यात कोविड - १९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून राज्यात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आळंदीसह लगतच्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थीविसर्जन करण्यासाठी परगावाहून मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून ते पुढील आदेश होईपर्यंत स्थानिक वगळून अन्य लोकांवर इंद्रायणी नदीत अस्थीविसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.