पुणे : मद्य प्राशन करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना (परमिट) न देताच दारू दुकानांमधून मद्यविक्री सुरू आहे. पंचवीस वर्षांखालील व्यक्तींना दारू पिण्यास तसेच विकण्यास मनाई असूनही वाईन शॉपमध्ये मात्र राजरोसपणे विनापरवाना दारूविक्री सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. शहरातील काही दारू दुकानांबाहेर उभे राहून केलेल्या पाहणीत अल्पवयीनांनाही दारू विकली जात असल्याचे दिसून आले. तर दारूविक्रीसाठी परवान्याची माहिती ना दारू दुकानदारांना आहे, ना विकत घेणाऱ्यांना. उत्पादनशुल्क विभागाने तर परवान्याची बाब दुय्यम कामांमध्ये घातली असून, त्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण दिले. शंकरशेठ रस्ता, डायस प्लॉट, दांडेकर पूल, बिबवेवाडी, कोथरूड, रास्ता पेठ, वारजे, कात्रज या भागांतील वाईन शॉपची पाहणी करण्यात आली. सोळा-सतरा वर्षांपुढील मुलांना वय न विचारताच दारू विकली जात होती. तसेच जे सज्ञान आहेत त्यांना परवाना विकत देणे बंधनकारक आहे. परंतु कोणत्याही दुकानामध्ये ग्राहकांना परमिट विचारले जात नव्हते. विनापरवाना दारूविक्री करण्यात येत होती. वास्तविक या परवान्याची किंमत अतिशय कमी आहे; परंतु उत्पादनशुल्क विभागाकडून वाईन शॉपवाल्यांकडे परमिट विक्रीचा आग्रह धरण्यात येत नाही. कायद्यानुसार शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, धार्मिक स्थळांपासून शंभर मीटरच्या क्षेत्रात दारूच्या दुकानांना बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. मात्र, या दारू दुकानांमधून दारू खरेदी केल्यानंतर मद्यपी या दुकानांच्या जवळच दारू पित बसलेले दिसून येतात. बेकायदा दारूविक्रीची दररोज नवी प्रकरणे समोर येत असताना मद्यसेवन करणाऱ्यांमध्येही विनापरवाना सेवन करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.
मनाई झुगारून विनापरवाना राजरोस मद्यसेवन
By admin | Published: July 23, 2015 4:34 AM