पुणे: महापालिकेच्या आवारात लावलेला ‘महापालिकेच्या आवारामध्ये आंदोलन, निदर्शने करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.’ हा फलक आम आदमी पक्षाच्या आंदोलनानंतर हटविण्यात आला आहे.
पुणे महापालिकेला भारतीय संविधानाच्या कलम १९ मध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी दिल्या गेलेल्या आंदोलनाच्या मौलिक अधिकाराचा विसर पडल्याचे दाखवून देत, आम आदमी पक्षाने पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीबाहेर आंदोलन केले. व नागरिकांच्या आंदोलनाचा अधिकार काढून घेणारा फलक लावल्याच्या कृतीचा निषेध करीत हा फलक काढून टाकण्याची मागणी केली. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने शुक्रवारी हा फलक हलविला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच महापालिका प्रशासनाकडून महापालिकेच्या आवारात कोणत्याही प्रकारचे आंदोलन केले जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देणारा फलक लावला होता. याला आम आदमी पक्षाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता, अशी माहिती निरंजन अडगळे यांनी दिली. आम आदमी पक्षाने केलेल्या या आंदोलनात मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, सुरेखा भोसले, अक्षय शिंदे, सतीश यादव, ॲड. अमोल काळे, नीलेश वांजळे, अमोल मोरे, संजय कोणे, निरंजन अडागळे, ॲनी अनिश, अनिश वर्गीसे, सेंन्थिल अय्यर, प्रीती निकाळजे, ऋषिकेश मारणे, आदी उपस्थित होते.