-श्रीकिशन काळे
पुणे :पुणे महापालिकेच्या शहरातील अनेक उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून आता उद्यान विभागाने प्रेमी युगुल किंवा जोडप्यांवर पोलिसींग करण्याचे काम सुरू केल्याचे दिसतेय. पालिकेच्या उद्यान विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षी निरीक्षण करणाऱ्या नागरिकांना अडथळा होत असल्याने पाषाण तलावाच्या परिसरात अविवाहित जोडप्यांना फिरण्या-बसण्यावर बंदी घातलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
पुणे महापालिकेतर्फे व परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटनांतर्फे पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात मैलापाणी येऊ नये, जलपर्णी वाढू नये, परिसरातील जैवविविधता कायम राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाषाण तलावाच्या परिसरात वृक्षांची संख्या मोठी असल्याने तेथे विविध जातीच्या पक्षांचे वास्तव्य आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड असणारे नागरिक पाषाण तलावाच्या परिसरात फिरतात. याच ठिकाणी प्रेमी युगुल फिरण्यासाठी येतात, पण त्यांच्यामुळे पक्षी निरीक्षणामध्ये अडथळे येत आहेत.
तक्रारीनंतर पालिकेचा निर्णय-
यासंदर्भात पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांनी उद्यान विभागाकडे तक्रार केल्याने अविवाहित जोडप्यांवर या ठिकाणी येण्यास मज्जाव केला आहे. मात्र, पाषाण तलाव परिसरात येणारे विवाहित जोडपे, अविवाहित जोडपे कोणते, प्रेमी युगुल, भाऊ-बहिण यातील फरक महापालिकेचे सुरक्षारक्षक व कर्मचारी कसे ओळखणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांनाही अडथळा-
पाषाण तलावात आतापर्यंत दोन मृतदेह आढळून आले आहेत. तेथे प्रेमी युगुल किंवा अविवाहित जोडप्यांमुळे वादविवाद होऊ शकतात. महापालिकेची तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांनाही अडथळा होत असल्याने त्यांना पाषाण तलावाच्या परिसरात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इतर सर्व उद्याने जोडप्यांसाठी खुली आहेत.