जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. त्या अनुषंगाने आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर मंदिर परिसर, कोंढवळ धबधबा, डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ आदी ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून संबंधित ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश ( १४४ कलम ) लागू करण्यात आले आहे. यामध्ये पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी आहे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करणे, धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक, अनधिकृत मद्यविक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर उफर वाजविणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांची असभ्य वर्तन करणे, हावभाव करणे, शेरेबाजी करणे असे कोणतेही वर्तन करणे. तसेच धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडून इतर सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश बंद आहे. आदींबाबत पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे. संबंधित आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते कारवाईस पात्र राहणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.
भीमाशंकर मंदिर परिसर व कोंढवळ धबधबा, डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ या ठिकाणी पर्यटक निसर्गप्रेमी यांनी प्रवेश करु नये. यासाठी घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने डिंभे येथील वाय काॅर्नर, पालखेवाडी येथे तर भीमाशंकर देवस्थानच्या वतीने भीमाशंकर एसटी स्टँडजवळ नाकाबंदी करण्यात आली असून पर्यटकांनी ह्या परिसरामध्ये प्रवेश करु नये, असे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे यांनी आवाहन केले आहे.