पुणे : येत्या शुक्रवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणेशाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीने करण्याची आपली परंपरा आहे. मात्र, शहरातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकांना मनाई करण्यात आली आहे. गणेश मंडळांनाही त्यांच्या मंदिरातच गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरात जवळपास ३ हजार ५४० सार्वजनिक गणेश मंडळे असून त्यापैकी बहुतांश मंडळांचे मंदिर आहे. या मंदिरातच यंदा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्या मंडळांचे मंदिर नाही, त्यांना छोटा मंडप घालण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद असून केवळ पूजा करण्यापुरतीच मोजक्या लोकांना परवानगी देण्यात आली आहे.
त्याचवेळी गणेश मंडळांसमोर दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. तसेच गणेश भक्तांना आकर्षित करेल व गर्दी होईल, अशी आरास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये. यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून १९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात प्रतिबंधात्मक आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत. कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळासमोर, कोणत्याही रस्त्यावर अथवा सार्वजनिक जागेत कोणत्याही ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचे लोळ निर्माण करणे अथवा हवेत सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.