राजेगाव : दौंड तालुक्याची संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी दारूबंदी कृती समितीचे प्रवर्तक रमेश शितोळे यांनी सुरू केलेले उपोषण आज सलग चौथ्या दिवशी सुरूच आहे. राजेगाव ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवून गावातून शासनाच्या निषेधार्थ फेरी काढून उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला असून आज आठ युवक आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवसापर्यंत उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने एकाही दारूधंद्यावर कारवाई न केल्यामुळे दौंड तालुक्यातील ढिम्म प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत उपोषणकर्ते आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज राजेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणामध्ये सौरभ जाधव, राजेंद्र कडू, चेतन हुक्के, चेतन भोसले, राजेंद्र कदम, संदीप दसवडकर, विशाल गायकवाड आणि संदीप लगड यांनी सहभाग घेतला आहे. उद्यापासून आणखी काही युवक स्वयंस्फूर्तीने उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याचे मनोदय उपोषणस्थळी भेट देऊन काही युवकांनी व्यक्त केला. दरम्यान, दौंड तालुका दारूबंदी समितीच्या वतीने उद्या (दि. ५) सकाळी अकरा वाजता पुणे-सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली हद्दीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दौंड पोलीस ठाणे व शासनाच्या विविध विभागांना दिले आहे.आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास चौधरी, उत्तमराव आटोळे, युवकाध्यक्ष नितीन दोरगे, माऊली कापसे, उत्पादन शुल्क विभागाचे सहायक निरीक्षक संजय साळवे, सहायक दुय्यम निरीक्षक गोरख नीळ, सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.
राजेगावला दारूबंदीसाठी ग्रामस्थांची निषेधफेरी
By admin | Published: January 05, 2017 3:19 AM