पुणे : महापालिकेने गेल्या दहा वर्षांत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पांची क्षमता शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे नवीन प्रकल्पांना मान्यता देण्याबाबतचा आक्षेप महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने घेतला असल्याने पालिकेकडून प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी उभारण्यात येणारे प्रकल्प अडचणीत आले आहेत.विशेष म्हणजे, हे प्रकल्प उभारण्याच्या अटीवर उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी महापालिकेला दिलेली ९ महिन्यांची मुदत ८ आॅक्टोबरला संपत असतानाच लेखापरीक्षणाच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, लेखा परीक्षणाच्या अहवालात घेण्यात आलेल्या आक्षेपांची तातडीने पूर्तता करण्यात येणार असून, प्रकल्पांना विलंब होऊ देणार नसल्याचे महापालिका आयुक्त कुमार यांनी सोमवारी सांगितले.जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महापालिकेचा कचरा उरुळी देवाची येथील डेपोवर येऊ न देण्याचा निर्णय घेऊन ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते. या वेळी महापालिकेकडून शहरातील ओला कचरा शहरातच जिरविण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये २ ते ५ टनांचे प्रकल्प उभारण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार, पालिकेकडून असे प्रकल्प उभारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, महापालिकेने ४६ टन क्षमतेच्या प्रकल्पाच्या कामांना मान्यता दिली असून, आणखी जवळपास तेवढ्याच क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. मात्र, लेखापरीक्षण विभागाने नवीन प्रकल्पांची आवश्यकता नसल्याचा आक्षेप घेतल्याने हे प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.
आॅडिट आक्षेपामुळे प्रकल्प अडचणीत
By admin | Published: August 04, 2015 3:29 AM