विशेष प्रतिनिधी जुन्नर (जि. पुणे) : छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन राज्यशासन काम करीत असून अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची महाराजांच्या लौकिकाला साजेशी असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. किल्ले शिवनेरीवर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे कार्यवाह रवींद्र काजळे आदी उपस्थित होते. शिवकुंज स्मारकातील बालशिवबाच्या शिल्पास मुख्यमंत्री फडणवीस व मान्यवरांनी अभिवादन केले. शिवजन्मस्थळापासून शिवकुंज स्मारकपर्यंत बालशिवबाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मुख्यमंत्री व मान्यवरांचे गडावरून प्रस्थान झाल्यानंतर राज्यातून आलेल्या शिवप्रेमींनी गडावर सोडण्यात आले. त्यानंतर मात्र गडावर मोठी गर्दी ऊसळली. राज्यातून मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी गडावर येत असतात त्यांना ऐनवेळी प्रवेश पास घेणे शक्य नसते,त्यांच्यासाठी शासनाने आॅनलाईन पासेस देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी यावेळी केली.८०% केसेस मागेमराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलकांवरील ८० टक्के केसेस मागे घेतल्या आहेत,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.