बारामती : तालुक्यातील सुपे-मेडद जिल्हा परिषद गटातील प्रचार पाण्याभोवतीच फिरत आहे. उपसा सिंचन योजना होऊनदेखील २५ वर्षांनंतरदेखील पाण्याचा प्रश्न कायम राहिला आहे. त्यावर अडीच वर्षांच्या काळात वीजपुरवठा, नदीतून वाहून जाणारे पाणी अडवून जादा आवर्तन देण्याचा प्रयत्न झाला आहे, असे भाजपाकडून निवडणूक प्रचारात सांगितले जात आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात योजना या भागासाठी वरदान ठरणारे आहे. आता कारखान्यांच्या मार्फत योजना पूर्ण क्षमतेने चालेल, अशी ग्वाही दिली जात आहे.या गटात भाजपाने जोरदार आव्हान दिले आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्नांना हात घालून जवळपास २५ गावे, वाड्यावस्त्यांवर होत असलेला प्रचार पाण्याभोवती फिरत आहे. आता काहीही करा; पण पाण्याचा प्रश्न मिटवा, अशीच मागणी गावागावांतील ग्रामस्थांकडून केली जात आहे. योजनेला २५ वर्षे झाली; परंतु अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा पुढे करून भाजपाने गावोगावी पाणीप्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. या गटात मागील निवडणुकीत जोरदार लढत झाली होती. पंचायत समिती गणाची जागा भाजपाने जिंकली होती. तर, जिल्हा परिषद आणि एक गण राष्ट्रवादीने जिंकला होता. आता दोन गट वगळता अन्य ४ गटांमध्ये तुल्यबळ उमेदवार विरोधकांनीदेखील दिले आहेत. शिवसेना, मनसे, बसपाचे उमेदवारदेखील रिंगणात असल्याने रंगत वाढली आहे. सुपे-मेडद गट सध्या लक्षवेधी ठरला आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, तसेच कारखान्यांमार्फत सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालवू, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. आरोप-प्रत्यारोप होत असताना या गटाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपाचे दिलीप खैरे, राष्ट्रवादीचे भरत खैरे, शिवसेनेचे सचिन बोरकर, काँग्रेसचे संजय चांदगुडे अशी बहुरंगी लढत आहे. (वार्ताहर)
२५ गावांत प्रचार ‘पाण्या’भोवतीच
By admin | Published: February 16, 2017 2:44 AM