पुणे : महापालिका निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी खासगी जागांवर फलक उभे करण्यास तसेच प्रचार करण्यास मनाई करून केवळ उमेदवारांच्या घरावर किंवा त्यांच्या मालकीच्या जागांवरच प्रचाराचे फलक उभारले जावेत, असा प्रस्ताव पोलीस आणि मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत मांडण्यात आला आहे. गुरुवारीच महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सभेची ठिकाणे महापालिका निश्चित करणार असल्याचे घोषित केल्यामुळे राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यातच प्रचाराबाबत अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यामुळे वाद उद्भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मनपा आयुक्त कुणाल कुमार, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त श्रीकांत पाठक, दीपक साकोरे, डॉ. बसवराज तेली, सुहास हिरेमठ, पी. आर. पाटील, पंकज डहाणे, गणेश शिंदे, कल्पना बारवकर, मनपाचे उपायुक्त सुहास मापारी, उपायुक्त तथा निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी उपस्थित होते.निवडणुकीसाठी लागणाऱ्या स्पीकर, वाहतूक, रॅली, प्रचार आदी सर्व प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी एकाच ठिकाणी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस, मनपा आणि महसूल या विभागांनी एकत्र येऊन एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मनपाच्या १४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी सुरू करण्यात येईल. त्यासाठी खास समन्वय अधिकारी नेमण्यात येणार आहे.सभेची ठिकाणे मनपा निश्चित करणार आहे. आतापर्यंत शहरातील आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांव्यतिरिक्त रस्ते, चौक अथवा अन्य ठिकाणी सभा घेतल्यास नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अन्य ठिकाणी सभा घ्यायला परवानगीच देण्यात येणार नाही. (प्रतिनिधी)
खासगी जागांवर प्रचारास मनाई
By admin | Published: January 14, 2017 3:45 AM