मार्गासनी : २५ वर्षे शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील (ता. वेल्हे) सदरेच्या व मंदिरांच्या सागवानी लाकडास नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यातील स्तंभास (खांब) पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले. राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगड संवर्धन या मोहिमेचे आयोजन दि. १५, १६ व १७ मार्च रोजी करण्यात आले होते. १५ मार्चपासून सुशांत मोकाशी, सिद्धेश कानडे, ओंकार शिंदे, आशुतोष बोरकर, दशरथ श्रीराम, आणि राजेश मारणर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सदरेच्या व मंदिरांच्या स्तंभाची पॉलिश पेपरने घासून स्वच्छता करण्यात आली. त्यात निर्माण झालेल्या छिद्रांमध्ये सुरुकात भुसा व फेव्हिकॉलचे मिश्रण भरून कीटकनाशक पॉलिश करण्यात आले. सलग दोन दिवस हे काम चालू होते.दि.१६ रोजी रात्री फर्जंद सिनेमाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचेसह नीलेश जेजुरकर, गौरव शेवाळे, जगदीश पवार, अतिष मुंगसे, शिव भांडेकरी, नगर जिल्ह्यातील डॉ. रमेश वामन, प्रशांत काकडे, अनिल दिवेकर, तेजस रोकडे, यशवंत कानडे, मयूर शिंदे, तुषार टेमकर व इतर सहकारीही यात सहभागी झाले. त्यांनी आतील व बाहेरील स्तंभ, दरवाजे, यांना पुढील ६ तासांमध्ये दुसरे कोटिंग चढवून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग दुर्ग सेवक सतीश हातमोडे, पनवेल येथील कल्पेश पवार, ललित पाटील, प्रवीण शिर्के व महेश बुलाख यांच्या टीमने तेथील स्तंभास शेवटचा तिसरा थर देऊन स्वच्छता केली.सह्याद्री प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून गडकोटांच्या संवर्धनासाठी काम करीत आहे. संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र शासन दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातशेहून अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या. स्वराज्याचे प्रवेशद्वार या उपक्रमांतर्गत किल्ले तुंग, किल्ले तिकोणा, किल्ले गोरखगड, किल्ले कर्नाळा येथील प्रवेशद्वार लोकसहभागातून उभारली.३१ मार्च २०१९ रोजी किल्ले तोरणागडावरील प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वराज्याचा तोफगाडा या माध्यमातून किल्ले सिंहगड, कुलाबा, कोथळीगड येथील बेवारस पडलेल्या तोफांना सागवानी तोफगाडे बसविण्यात आलेत.तसेच जंजिरा येथे कायमस्वरूपी राष्ट्रध्वज लावण्यात आला. किल्ले पद्मदुर्ग येथे सर्वांत उंच भगवा ध्वज लावण्यात यावा यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नवी दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात नीलेश जेजुुुरकर यांनी युवकांना आवाहन केले की मोठे काम झाले असले तरी अजूनही भरपूर काम शिल्लक आहे. जवळपास ६० स्तंभचे काम बाकी आहे. येत्या पावसाळ्याच्या अगोदर हे काम करण्यात येईल. आपण मिळूनच हे काम पूर्ण करू शकतो. सुशांत मोकाशी यांच्या पुढाकाराने पुढील मोहिमेची बांधणी लवकरच आखण्यात येईल.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजगडावर पुरातन लाकडाचे संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:47 AM