वारजे : या आठवड्यात साजरे होत असलेल्या पोलीस रायझिंग डेनिमित्त वारजे वाहतूक विभागातर्फे गाजलेल्या कार्टून शो छोटा भीमच्या हातात हेल्मेट देत त्याबाबत जनजागृती केली. जर शक्तिशाली असलेल्या छोट्या भीमला दुचाकी चालवताना हेल्मेटची गरज भासते, तर सर्वसामान्य पुणेकरांनीदेखील त्यांच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट आवश्यक असल्याचे मत यावेळी सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
सध्या वाहतूक पोलिसांचा रस्ता सुरक्षा सप्ताह चालू असून त्याअंतर्गत रायझिंग डेनिमित्त वारजे व दत्तवाडी वाहतूक विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते याच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे, उपनिरीक्षक ए. एन. घुले व लाड यांच्याबरोबरच दत्ता झंजे, राजीव पाटील उपस्थित होते. यावेळी नागरिकांना हेल्मेट वापराचे महत्त्व, मोटार चालवताना सीट बेल्टचा वापर करणे, झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे वाहन थांबविणे, वाहन चालवताना मोबाईलवर न बोलणे, वेगमर्यादा पाळणे, रस्त्यावर पादचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देणे, सिग्नलचे उलंघन न करणे आदींबाबत जनजागृती करण्यात आली.दोन्ही हातात हेल्मेट असलेला छोटा भीम जणू नागरिकांना हेल्मेट वापराबाबत साद घालत असल्याचे दिसते. त्यामुळे वाहचालकदेखील कुतूहल निर्माण झाल्याचे पाहायला मिळत होते. यावेळी वाहतुकीचे नियम पाळणाºया व हेल्मेटधारी दुचाकीचालकांचे खास गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांशी व्यक्तिश: संवाद साधून त्याने हेल्मेट वापराचे महत्त्व विषद केले. हेल्मेट नसल्याने डोक्याला मार लागून अपघातग्रस्त दुचाकीचालकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथादेखील सांगण्यात आल्या.