पुणे : लोकशाही राज्यातील अगदी तळातील ग्रामसंसद म्हणजेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. जिल्ह्यातील ६१२ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (४ आॅगस्ट) मतदान होत आहे. त्याची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय ७ पोटनिवडणुकांसाठीही मतदान होत आहे़ जिल्ह्यातील ७०४ पैकी तब्बल ७९ गावांत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मुळशी तालुक्यात सर्वाधिक १३, तर वेल्ह्यातील १२ गावांत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांना आलेले महत्त्व. कधी नव्हे, इतकी चुरस यंदाच्या निवडणुकीत पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायत सदस्यांना प्रचारासाठी केवळ २५ हजार रुपये खर्चाची मुभा आहे. मात्र, या निवडणुकीत काही गावांत उमेदवारांनी कोट्यवधींचा चुराडा केला, तर अनेकांचा खर्च लाखांच्या घरात गेला आहे. निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. गावात ताणतणाव निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास दहा लाखांचे पारितोषिक जाहीर केले होते. त्याचा लाभ जिल्ह्यातील केवळ ७९ ग्रामपंचायतींनी घेतला. ६१२ ग्रामपंचायतीत मंगळवारी निवडणूक होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मतदानही मंगळवारी होत आहे. १०५ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर सक्षम उमेदवार नसल्याने ८१ जागा रिक्त राहिल्या. (प्रतिनिधी)
प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By admin | Published: August 03, 2015 4:28 AM