पुणे : कालचे मित्र आजचे शत्रू होऊन समोरासमोर ठाकले. एका रात्रीत प्रस्थापित पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उमेदवार पवित्र होऊन दुसरा झेंडा हातात घेतानाही मतदारांनी पाहिले आहेत. इतकेच काय भाऊबंदकीची टाळीही मतदारांनी ऐकली आहे. आता या गदारोळातच मतदानाची घटिका समीप आली असून, उमेदवारांच्या पारण्याच्या वरातींचा आवाजही आज शांत होत आहे. बुधवारी (दि. १५) मतदान होणार असल्याने सोमवारी (दि. १३) सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. सोमवारी सायंकाळनंतर आचारसंहिता लागू होणार असल्याने कोणत्याही प्रकारचा जाहीर प्रचार, मिरवणुका तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रचार करता येणार नाही. निवडणुकीचे एक्झिट पोलचे निष्कर्ष प्रसारित करण्यावरही प्रतिबंध असेल. त्यामुळे रविवारचा सुट्टीचा दिवस साधत उमेदवारांनी रॅली, पदयात्रा, गाठीभेटींद्वारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तीन दिवस आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती तुटली. त्यामुळे अनेकांना अचानकच उमेदवारीची लॉटरली लागली असली तरी त्यांच्याकडे प्रचारासाठी फक्त पंधरा दिवस होते. कमी कालावधीत जास्तीत जास्त प्रचार करण्याचे आव्हान उमेदवारांसमोर होते. तसेच काल गळ््यात गळे घालून फिरलेल्या मित्रपक्षांशी राजकीय शत्रूत्व घेण्याची वेळ उमेदवारांवर आली. ही राजकीय उलथापालथ लक्षात घेऊन उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले. आपले वेगळेपण ठसविण्यासाठी एलईडी स्क्रिन, व्हॉट्स अॅप, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. त्यासाठी कुशल व्यक्तींची मदत देखील घेण्यात आली. उमेदवारांपासून ते विविध पक्षांनी मोठ्या प्रमाणावर जाहीरातबाजी करीत शहरातील नाके, ग्रामीण भागातील पार ते आधुनिक सोशल कट्ट्यावर चर्चेचा धुराळा उडवून दिला होता. कमी कालावधीत अनेक सभा घेण्यसाठी हेलिकॉप्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. (प्रतिनिधी)
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
By admin | Published: October 13, 2014 12:36 AM