चासकमान : खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात वाडा कडूस जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यामुळे या गटात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. पदयात्रा, घरोघरी भेटी, महिलांचा प्रचार, घोषणाबाजीने प्रचारात रंगत येत आहे. यामुळे संपूर्ण गटातील जनतेचे या गटाकडे लक्ष लागले आहे. या गटामध्ये सर्व पक्षांनी येथे उमेदवार उभे केले असल्यामुळे प्रचार यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. फेसबुक, व्हॉट्स अॅप, तसेच भजनी भारुडांद्वारे हायटेक प्रचार सुरू केला आहे. वाहनांवर ध्वनिवर्धक लावून वेगवेगळ्या गाण्याच्या गवळणीच्या ठेक्यावर भजनी भारुडांद्वारे प्रचार करण्यात येत आहे. तसेच चित्रफित असलेली गाडी चौकाचौकात उभी केली जात आहे. हायटेक प्रचार करूनही मात्र मतदार सांगतील तो उमेदवार निवडून देणार आहेत. महिला उमेदवार रिंगणात असल्याने त्यांच्या पतीराजाने प्रचारात आघाडी घेतली आहे. खेड तालुक्यातील विविध भजनी, भारुड पथकांनी पथके तयार करून रोजगार मिळविला आहे. या मतदारसंघात तीन नवख्या महिला उमेदवार असून या मतदारसंघात विकासकामांबद्दल पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या कामाचा आढावा मांडला जात आहे. सत्ताधारी पक्ष वेगळे लढत असल्याने एकमेकांवर आरोप करून वस्त्रहरण करू लागले आहेत, मात्र आपल्या गटातील करावयाची कामे आणि अपूर्ण कामे यांचा कोणाकडे लेखाजोखा नाही. प्रचाराला मिरवणुका काढून स्वत:ची हवा करत आहे. मात्र या भूलथापांना मतदार न भूलता डोळ्यासमोर चांगला उमेदवार निवडून देऊन मतदान करण्याची चर्चा आहे. नोटबंदीनंतर ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडले आहे. ही परिस्थिती बदलावी असे त्यांना वाटते.या निश्चितपणाने आपल्या मतदानातून मतदार जागा दाखवणार आहे. वाडा-कडूस गटात वाडा, कडूस, चास ही पश्चिम भागातील निमशहरी गावे आहेत, या गावांना अनेक वाड्या-वस्त्या आहेत. या तीन गावांच्याभोवती उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या गटात गेल्या पंधरा दिवसांपासून उमेदवार आपल्या पद्धतीने प्रचार करताना भजनी मंडळाची पथके सध्या आपल्या पद्धतीने विविध गाण्यांच्या ठेक्यावर आपल्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह पोहोचवताना प्रयत्न करीत आहे.
भजन, भारुडाच्या ठेक्यावर प्रचार
By admin | Published: February 19, 2017 4:29 AM