धायरी: खडकवासला धरण चौपाटीवर उभारण्यात आलेल्या 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंटची तोडफोड करणाऱ्या मुख्य सुत्रधारास तातडीने अटक करण्यात यावी. या मागणीसाठी खडकवासला ग्रामस्थांनी निषेध आंदोलन केले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे चौकशी करून यातील मुख्य सुत्रधार शोधून काढावा अशी मागणी यावेळी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.
खडकवासला ग्रामपंचातीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंटचे १४ जून रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याच रात्री काही तरुणांनी खडकवासला धरण चौपाटीवरील या सेल्फी पॉईंटची तोडफोड केली होती. याबाबत सरपंच सौरभ मते यांनी अज्ञातांविरोधात हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आकाश गोपीनाथ मते (वय 21, रा.खडकवासला, ता.हवेली) व गौरव सुहास रणधीर ( वय 21, रा. खडकवासला) या दोघांना याप्रकरणी हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या मागचा खरा सूत्रधार कोण आहे. याचा छडा लावण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली.
पोलिसांनी यामागील खरा चेहरा समोर आणला नाही. तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. या तोडफोडीमागील सुत्रधारांना तात्काळ अटक करून, त्याची नावे जाहीर करावीत. आणि त्यांना योग्य ते शासन करून भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घ्यावी, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करुन, आरोपींना अटक करू' असे आश्वासन यावेळी हवेली पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आले.