शहराच्या मध्यवर्ती भागातील घरात चोऱ्या होऊ लागल्या आहेत. चोर विविध अवजारांचा वापर करून घराचे कुलूप तोडण्यात माहीर झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने कुलूप विक्रेत्या दुकानदारांशी संवाद साधला.
कोरोनाच्या संचारबंदीत दुकाने बंद होती. रस्त्यावर नागरिकांना फिरण्यासही परवानगी नव्हती. या काळात चोरांनी न घाबरता दुकाने फोडली. दुकानांना दोन, तीन कुलूप लावली असूनही ते फोडून चोऱ्या झाल्या आहेत. आता सर्व गोष्टी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. मग मंदिरांबरोबरच घरांमध्ये चोऱ्या होऊ लागल्या. चोरांकडे हातोडी, पक्कड, रॉड या बरोबरच विशिष्ट अशी विविध प्रकारची अवजारे असतात. त्यांना कुलूप तोडता आले नाही. तर ते रॉडच्या साहाय्याने दाराची कडीच उखडून टाकतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
बाजारात पॅड लॉक, शटल लॉक, डिजिटल लॉक, पासवर्ड लॉक, नाईट लॅच लॉक अशा प्रकारचे कुलूप उपलब्ध आहेत. तर गोदरेज, युरोपा आणि लिंक या कंपनीच्या कुलूपांना नागरिकांकडून मागणी असते.
ग्रामीण भागातील नागरिक दणकट आणि महाग कुलूप घेण्यावर भर देतात. त्यांना घराच्या सुरक्षेची काळजी असते. परंतु, शहरी आणि उच्चभ्रू सोसायटीतील नागरिक कुलूपावर खर्च करत नाहीत. ते सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, सोसायटी बाहेरील सुरक्षा रक्षक, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यांच्यावर अवलंबून असतात. कुलूप म्हणजे पूर्ण घराचे संरक्षण करते. नागरिकांनी खबरदारी घ्यायला पाहिजे. शंभर, दोनशे रुपयांचे कुलूप घेण्यासाठी नागरिक विचार करतात. कुलूप विकत घेताना त्याचा दणकटपणा, ब्रॅन्ड, क्वालिटी, याकडे दुर्लक्ष केले जाते. कमी किंमतीच्या कुलुपांना पसंती दिली जाते. आता तरी नागरिकांनी सतर्क व्हावे. सुरक्षेच्या दृष्टीने दणकट कुलूप विकत घ्यावे. तसेच शक्य होत असल्यास कॅमेरा लावण्याला प्राधान्य द्यावे, असे दुकादारांनी सांगितले आहे.
चौकट
शहरात घरफोड्या होण्याचे प्रमाण कमी होत नाही. २०१९ मध्ये ४६० घरफोड्या झाल्या होत्या. तर मागील वर्षी संचारबंदी असूनही ३३० घरफोड्या झाल्या आहेत. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये हे प्रमाण कमी झाले. पोलीस बंदोबस्त आणि नागरिक बरेच महिने घरात असूनही हे प्रमाण जास्त आहे.
चौकट
कुलुपांची मागणी ( टक्केवारीत )
पॅड लॉक ७० टक्के
शटल लॉक १० टक्के
डिजिटल लॉक १० टक्के
नाईट लॅच लॉक ५ टक्के
नॉब लॉक ५ टक्के
दणकट आणि महाग कुलूप २५ टक्के
कमी दणकट आणि कमी महाग ५० टक्के
अगदीच कमी दणकट स्वस्त कुलूप २५ टक्के
सर्वात महाग कुलूप साधारण ३००० रुपये
सर्वात स्वस्त कुलूप २० रुपयापासून सुरुवात