नारायणगाव (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी रोपवे बांधण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला राज्य सरकारने प्रतिसाद दिला असून, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची मागणी पूर्ण होणार आहे.
जुन्नर पर्यटन तालुका घोषित झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवासह वर्षभर येणाऱ्या पर्यटकांसाठी रोपवे बांधण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यावेळी गडकरी यांनी राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास पर्वतमाला योजनेंतर्गत निधी मंजूर करण्याची तयारी दर्शवली होती. त्याअनुषंगाने खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली होती.
डॉ. कोल्हे यांच्या मागणीबरोबरच राज्यातील इतर पर्यटनस्थळी रोपवे बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार शिवनेरी गडासह अलिबाग चौपाटी ते अलिबाग गड, पन्हाळा (ज्योतिबा), त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, माथेरान, जेजुरी, विशालगड (कोल्हापूर), घारापुरी (एलिफंटा, जिल्हा रायगड) ब्रह्मगिरी - अंजनेरी (जिल्हा रायगड) माहूर (जिल्हा हिंगोली) या १२ पर्यटनस्थळी रोपवे बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली शिवशंभू भक्तांची मागणी पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
यासंदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शिवनेरी गडावर रोपवे बांधल्यास ज्येष्ठ नागरिकांसह महिला भगिनी व सर्वच थरातील शिवशंभू भक्त, इतिहासाचे अभ्यासक आदींना गडावर जाण्यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळेलच, शिवाय तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यटनाला चालना मिळाल्यानंतर ''डे टुरिझम''कडून स्टे टुरिझम''कडे वाटचाल सोपी होईल आणि त्यातूनच तालुक्याचे अर्थकारणही बदलेल, असा विश्वास खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त करीत शिवनेरीचा रोपवे मंजूर होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.