पुणे : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, एमआयडीसीसह सर्वत्रच वाढत्या गुन्ह्यांच्या संख्येमुळे पोलिसांवर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याचे प्रस्तावदेखील वाढत आहेत. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात नव्याने सहा ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच राज्यासह पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नवीन प्रस्तावित पोलीस स्टेशन, मंजूर पोलीस स्टेशनची बांधकामे याचा आढावा घेतला. यात पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात इंदापूर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन नीरा-नृसिंहपूर पोलीस ठाणे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन सुपा पोलीस ठाणे, बारामती तालुका व वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन माळेगाव पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
याशिवाय लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे, दौंड उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून नवीन शिरूर पोलीस अधिकारी कार्यालय, निर्माण करणेबाबत. उपविभागीय मंचर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे निर्माण करणेसंदर्भात प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात पवार यांच्या बैठकीत देखील चर्चा झाली. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पोलीस स्टेशनसाठीच्या शासकीय जागांना त्वरित मंजुरी देण्याची तयारी बैठकीत करण्यात आली.