पुणे: महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या पहिल्या अंदाजपत्रकामध्ये पुणेकर नागरिक व त्यांचे आरोग्यासाठी विविध योजना हाती घेतल्या. यामध्ये शहराच्या विविध भागात योग केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सलग तीन वर्षांच्या अंदाजपत्रकांमध्ये कोट्यवधी रुपयांची तरतुद देखील केली. परंतु, गेल्या तीन वर्षांत शहरामध्ये एकही योग केंद्र सुरु झाले नाही. महापालिकेच्या अकार्यक्षम प्रशासनामुळे दर वर्षी योग केंद्रां निधी परत गेला आहे. महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पहिले अंदाजपत्रक सादर करताना शहरातील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिलासह समाजातील सर्व घटकांना भारतीय योग शास्त्राची ओळ व्हावी, त्याचा नियमित योगाभ्यास घडवून नागरिकांचे आरोग्य बलशाली व रोगमुक्त करण्यासाठी शहराच्या विविध भागात योग केंद्र उभारण्याची घोषणा केली. यासाठी अंदाजपत्रकामध्ये तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांची तरतुद देखील केली. परंतु, पहिल्या वर्षांत आरोग्याच्या इतर अनेक योजनासोबतच योग केंद्र उभारण्याचा निर्णय कागदावरच राहिला. त्यानंतर नव्याने स्थायी समिती अध्यक्ष झालेल्या योगेश मुळीक यांनी देखील आपल्या अंदाजपत्रकामध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सर्व १३६ इमारती व शहरातील सर्व उद्यानांमध्ये योग प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध करुन देणे व योग केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अंदाजपत्रकामध्ये २ कोटी रुपयांची भरीव तरतुद देखील करण्यात आली. परंतु अद्यापही ही योग केंद्र उभारण्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर कोणत्याही उपाय-योजना करण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गेली तीन वर्षे योग केंद्राचा निधी खर्च न झाल्याने अन्य कामांसाठी वळविण्यात आल्याची वस्तुस्थिती समोर आली.-------------------वर्षा अखेरपर्यंत किमान तीन योग केंद्र सुरु करणार पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहराच्या प्रत्येक भागात योग केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दृष्टीने प्रयत्न सुरु असून, शहरातील बाणेर, धनकवडी आणि आंबेगाव बु. येथे अॅमेनिटी स्पेसच्या जागांची पाहणी करून येथे मल्टिपर्पज हॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने योग केंद्र ही संकल्पना घेऊन सर्व ठिकाणी योगा थिमवर एकसारखी केंद्र उभारण्याचे नियोजन सुरु आहे. या वर्षा अखेरपर्यंत किमान तीन केंद्र सुरु करण्याचे नियोजन आहे...-मुक्ता टिळक, महापौर
शहरभर योग केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव ‘शवासना’त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 6:00 AM
गेल्या तीन वर्षांत शहरामध्ये एकही योग केंद्र सुरु झाले नाही.
ठळक मुद्देयोग केंद्रासाठी तीन वर्षांत अंदाजपत्रकामध्ये केवळ तरतुदचवर्षा अखेरपर्यंत किमान तीन योग केंद्र सुरु करणार